
मतदारसंघातील जनतेसाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून सवलतीच्या दरात आरटी- पीसीआर कोरोना चाचणी सेवा उपलब्ध झाली आहे.
शिर्डी (अहमदनगर) : मतदारसंघातील जनतेसाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून सवलतीच्या दरात आरटी- पीसीआर कोरोना चाचणी सेवा उपलब्ध झाली आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीची खात्री नाही. याबाबत पुढील महिन्यात पुराव्यांसह वस्तूस्थिती मांडू.
केंद्र सरकारने देशातील धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय पूर्वीच जाहीर केला. आता ऑनलाईन पासेसद्वारे भाविकांची गर्दी नियंत्रीत करू शकणारे साईमंदिर सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.
नगर येथील डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटल व शिर्डी नगरपंचायतीतर्फे सुरू केलेल्या कोरोना चाचणी नमुना संकलन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. विखे पाटील बोलत होते. नगराध्यक्ष अर्चना कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन, नगरसेवक अभय शेळके, नितीन कोते, मनोज लोढा, ज्ञानेश्वर गोंदकर, प्रमोद गोंदकर, "गणेश'चे उपाध्यक्ष प्रताप जगताप, मधुकर कोते आदी उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले, ""रॅपीड अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पॉझिटिव्हच निघतात. मात्र, निगेटिव्ह अहवालाबाबत खात्रीने काही सांगता येत नाही. या अर्थाने हे किट बोगस आहेत. हे आपण पुराव्यांसह सादर करणार आहोत. "आरटी पीसीआर' चाचणीच खात्रीशीर आहे. सरकारी दरापेक्षाही कमी खर्चात ही चाचणी केली जाणार आहे. त्यात 10 वर्षांखालील व 50 वर्षांपुढील रुग्णांची चाचणी केवळ 500 रुपयांत केली जाईल.''
राज्य सरकार आपोआप पडेल
डॉ. विखे पाटील म्हणाले, की राज्यातील सरकार तीन चाकांवर चालते. हवा भरायची वेळ आली, तर ती मुंबई, बारामती की संगमनेरात जाऊन भरायची, हे कुणालाच ठाऊक नाही. हे तीन चाकांवरचे सरकार भाजप कशाला पाडेल, ते आपोआप पडेल. शिर्डी व परिसराचे अर्थकारण ठप्प झाले. साईमंदिर सुरू करण्याबाबत ग्रामस्थ व पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविणार आहेत.
संपादन : अशोक मुरुमकर