
""मंत्री मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अशा स्वरूपाची तक्रार आपल्याविरुद्ध दाखल होण्याची शक्यता असल्याचे पत्र पोलिसांत दिले होते.
शिर्डी : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने केलेले आरोप हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, की खरेच तिच्यावर अत्याचार झाला आहे, याचा शोध घेऊन या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.
पोलिसांनी ही जबाबदारी पार पाडावी, अशी भाजपची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज दिली. वाघ यांनी आज सायंकाळी येथे येऊन साईदर्शन घेतले.
नंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ""मंत्री मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अशा स्वरूपाची तक्रार आपल्याविरुद्ध दाखल होण्याची शक्यता असल्याचे पत्र पोलिसांत दिले होते. त्यामुळे या महिलेची तक्रार दाखल झाल्यानंतर, चौकशीनंतरच निर्णय घेण्याचे ठरविले असल्याची माहिती भाजपला पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - अण्णांच्या गावात मतदारांना साड्यावाटप
दरम्यान, आज काही अन्य लोकांनी, या महिलेकडून आपल्याला असाच अनुभव आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेची आहे.''
भंडारा जळीतकांडाबाबत सरकार संवेदनशील नसल्याचे दिसून आले. 48 तासांत तेथील रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठीचे पथक काल (बुधवारी) तेथे रवाना झाल्याची टीका वाघ यांनी केली.