esakal | आदर्श गाव राळेगण सिद्धीत मतदारांना साड्यावाटप, भरारी पथकाने दोघांना रंगेहात पकडले
sakal

बोलून बातमी शोधा

Distribution of sarees to voters at Ralegan Siddhi

भरारी पथकाचे अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.​

आदर्श गाव राळेगण सिद्धीत मतदारांना साड्यावाटप, भरारी पथकाने दोघांना रंगेहात पकडले

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः आदर्श गाव राळेगणसिद्धीने ग्रामविकासात मोठे नाव केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे हे देशभरात पोहोचले. गावकऱ्यांच्या एकीने अनेक आदर्श निर्माण झाले. परंतु या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याला गालबोट लागले आहे. या घटनेने गावाची प्रतिमा मलिन झाली आहे.

भरारी पथकाचे अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबत माहिती अशी की, आज (ता. 14)  सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राळेगणसिद्धी येथे सुरेश दगडू पठारे तसेच किसन मारूती पठारे यांना मतदारांना साडया वाटताना भरारी पथकाने रंगेहात पकडले.

दोघांनाही तहसीलदार ज्योती देवरे यांच्यापुढे हजर करण्यात आल्यानंतर देवरे यांनी  त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भरारी पथकाचे अधिकारी बुगे यांच्या फिर्यादीनुसार या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

राळेगणसिद्धीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव एकत्रीत ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आला होता. गावातील परंपरागत विरोधक असलेले जयसिंग मापारी व लाभेश औटी यांनी आपल्यातील राजकीय विरोध बाजूला ठेवून गावाची निवडणुक बिनविरोध  करण्याचे ठरविले होते. त्या साठी नांवेही निश्चित केली होती. त्या नांवावर व बिनविरोध निवडणुकीवरही

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत राळेगणसिद्धीत झालेल्या बैठकीत मान्यताही देण्यात आली होती. मात्र, काही तरूणांनी व राजकीय विरोधकांनी ठराविक लोकांनी बिनविरोध निवडणुकीचा व सदस्यांची नावे निवडण्याचा निर्णय परस्पर घेतला आहे.

हेही वाचा - कट्टर विरोधक थोरात-विखे गट झाले एक

आम्हाला विश्वासात घेतले नाही, असा प्रचार गावात करत बिनविरोध निवडणुकीच्या विरोधात भूमिका घेतली. आम्हाला विश्वासात घेतले नाही, ही तक्रार हजारे यांच्याकडेही केली. त्या वेळी हजारे यांनी तुम्हाला मान्य नसेल तर लोकशाही मार्गाने कुठलेही गालबोट लागणार नाही. या पद्धतीने निवडणुक करा, असा सल्ला दिला होता.

कालपर्यंत अतिशय शांततेत प्रचार करीत असलेल्या आदर्श गाव राळेगणसिद्धीतच आज साड्या वाटताना सुरेश पठारे व किसन पठारे या दोघांना 136 साड्या व एक चारचाकी गाडीसह रंगेहात बुगे यांनी पकडले. त्यांच्यासोबत महिलासुद्धा होत्या. मात्र, त्यांना ताब्यात घेतले नाही, असेही समजते. 

तालुक्यात अनेक गावात पैसे वाटले असल्याच्या तक्रारी येत आहेत. यात पिंपरी जलसेनमध्ये  पैशांचे वाटप झाले असल्याचे समजले. मात्र तहसीलदार देवरे यांनी माझ्याकडे तक्रार आली नाही, असे सांगितले.