देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीबाबत कोणता आखलाय मास्टर प्लॅन?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

मुंबईतील फडणवीस यांच्या बंगल्यात (मंगळवारी) रात्री बैठक झाली. त्यात नगर जिल्ह्यातील सर्वच भाजप नेते उपस्थित होते.

नगर ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे स्वतंत्र पॅनल उभे करण्याचा निर्णय झाला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. 

मुंबईतील फडणवीस यांच्या बंगल्यात काल (मंगळवारी) रात्री बैठक झाली. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री राम शिंदे व शिवाजी कर्डिले, माजी आमदार वैभव पिचड व बाळासाहेब मुरकुटे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, विठ्ठल लंघे, सुजित झावरे, प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - लग्नाळू मुलांनो सावधान, तुमच्याबाबतही घडू शकतं असं

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी भाजपने पूर्वीच तयारी सुरू केली होती. खासदार डॉ. विखे पाटील यांनी स्वतंत्र पॅनलचे संकेतही दिले होते. 20 फेब्रुवारी रोजी बॅंकेच्या 21 जागांसाठी मतदान होत आहे. त्यात सेवा संस्थांमधून 14, मागास प्रवर्गातून 1, महिला राखीवमधून 2, अनुसूचित जमाती 1, भटके विमुक्त 1, शेतीपूरक संस्था 1 व बिगरशेती संस्थांमधून 1, अशा प्रकारे संचालकांची निवड होणार आहे. 

नगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. मातब्बर नेते भाजपमध्येच आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक स्वतंत्र लढल्यास बॅंकेवर भाजपचीच सत्ता येईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर फडणवीस यांनी स्वतंत्र लढण्यास "ग्रीन सिग्नल' दिला. याबाबतचे सर्व अधिकार फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

भाजपमध्ये मातब्बर नेते आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेवर भाजपची सत्ता आणणे सोपे होणार आहे. त्यामुळे भाजप स्वतंत्र पॅनल करणार असून, बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा देता येणार आहेत. 
- प्रा. भानुदास बेरड, कार्यकारिणी सदस्य, भाजप 

बॅंकेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनलचा आग्रह सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बॅंकेवर भाजपचाच झेंडा फडकताना दिसेल. 
- अरुण मुंडे, जिल्हाध्यक्ष, भाजप 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's Mission Ahmednagar: Fadnavis has come up with a master plan for Nagar District Bank