सुंदर मुलीचं स्थळ चालून आलंय काय; लग्नाळू मुलांनो सावधान, तुमच्याबाबतही घडू शकतं असं!

गौरव साळुंके
Thursday, 21 January 2021

आरोपींत श्रीरामपूरसह औरंगाबाद, अकोला, बुलडाणा, कोल्हापूर येथील तरुणींसह महिलांचा समावेश आहे.

श्रीरामपूर ः सध्या समाजात स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तर असमान आहे. त्यामुळे लग्नासाठी मुली मिळणे मुश्कील झाले आहे. बहुतांशी लग्न मॅट्रोमॉनी साईटवरून जमतात. परंतु त्यात काहीजणांची फसवणूक झाल्याचे दिसून येते आहे. केवळ हेच नाही तर ठरवून जमवलेल्या लग्नातही तसेच होते आहे. तुम्ही जर लग्नाळू असाल तर सावध रहा, नाही तर तुमचं काही खरं नाही.

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि राजस्थानात बनावट विवाह करून वराची आर्थिक फसवणूक करणारी महिलांची टोळी पोलिसांनी उघडकीस आणली.

आरोपींत श्रीरामपूरसह औरंगाबाद, अकोला, बुलडाणा, कोल्हापूर येथील तरुणींसह महिलांचा समावेश आहे. या टोळीने राज्यासह परराज्यांतील विवाहेच्छू तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले. 

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांनी काय आखलाय मास्टर प्लॅन

शहर पोलिसांनी संशयित आरोपी अनिता कदम (रा. दत्तनगर, श्रीरामपूर) हिला पूर्वीच अटक केली होती. सुजाता खैरनार (रा. मालेगाव), ज्योती ब्राह्मणे (रा. दत्तनगर), जयश्री ठोंबरे (रा. कोल्हापूर) यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पसार आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. 

ते म्हणाले, ""शहरातील दत्तनगर येथील केटरिंगच्या कामासाठी मालेगाव येथील विवाहितेला आणले होते. आरोपी अनिता कदम हिने औरंगाबाद येथील मैत्रिणीच्या मदतीने या विवाहितेचा इंदूर (मध्य प्रदेश) येथील एका तरुणाशी पुन्हा विवाह लावला. त्यात संबंधित तरुणास दोन लाख रुपयांना लुटले.

हा प्रकार समोर आल्यावर विवाहितेच्या मालेगाव येथील पतीने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या टोळीने इंदूर, जयपूरसह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथेही बनावट विवाह करून अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले. 

तपासासाठी पोलिसांनी मध्य प्रदेशकडे धाव घेतली. त्या वेळी, संबंधित तरुणी टोळीची सदस्य असून, पैशांसाठी तिने बनावट विवाह केल्याचे समजले. राज्यातील विविध भागांत ही टोळी कार्यरत असून, विवाह जमविताना सखोल माहिती घेण्याचे आवाहन अधीक्षक पाटील यांनी केले. 

असा घालतात गंडा 
विवाहेच्छू तरुणांचा शोध घेऊन टोळीतील सुंदर तरुणीचे फोटो दाखविले जातात. तरुणाच्या कुटुंबाकडे पैशांची मागणी करीत, विवाह साधेपणाने केला जातो. विवाहानंतर काही दिवसांतच वाद निर्माण करून पैशांसह सोन्याचे दागिने घेऊन ही नववधू पसार होते. समाजातील प्रतिष्ठेपोटी पोलिसांत तक्रार देण्यासाठीही कोणी पुढे येत नाही. त्यामुळे पोलिसांनाच अशा घटनांत फिर्यादी व्हावे लागले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women from Aurangabad, Kolhapur, Akola, Buldana were cheating on their marriage Crime news