मंदिर उघडण्यासाठी भाजपाचे 'राम' गोदड महाराजांच्या द्वारी

नीलेश दिवटे
Saturday, 29 August 2020

राज्यातील आघाडी सरकारमध्ये एकमत नाही. त्यांच्यातील भांडणे झाकण्यासाठी हे प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत. यामुळे मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. तसेच शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही ती दरवाढ करावी, अशी मागणी श्री शिंदे यांनी केली.

कर्जत: सरकारने मंदीर उघडण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी दिला.

आज येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी सदर मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांना देण्यात आले. उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडीक, प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, काका धांडे, महासंग्रामाचे तालुकाध्यक्ष भारत मासाळ, किसान आघाडीचे अध्यक्ष राहुल निंभोरे, युवक नेते स्वप्निल देसाई, एकनाथ धोंडे, शांतीलाल कोपनर, विश्वास डमरे, सुनील यादव, रामदास हजारे, नगरसेवक अमृत काळदाते, अनिल गदादे,गणेश पालवे यांचे सह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - मुस्लिम समाजाला भावला गडाखांचा शिवसेना प्रवेश

ते म्हणाले, राज्य शासनाने दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र मंदीर सुरू करण्यास परवानगी दिली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील मंदीर बंद आहेत. मंदिर बंद असल्याने या संबंधात असलेले सर्व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकारने देशातील मंदीर सुरू करण्याबाबत राज्यांना सुचना दिल्या आहेत. शिवाय न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकारला फटकारले आहे.

राज्यातील आघाडी सरकारमध्ये एकमत नाही. त्यांच्यातील भांडणे झाकण्यासाठी हे प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत. यामुळे मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. तसेच शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही ती दरवाढ करावी, अशी मागणी श्री शिंदे यांनी केली.

या बाबत राज्य सरकारने लवकरच निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी गोदड महाराजांचे सर्व पुजारी व येथील व्यावसायिक यांनी बंदमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत राम शिंदे यांना निवेदन दिले. सदर आंदोलनानंतर ग्रामदैवत संत गोदड महाराज यांची आरती करण्यात आली.

या वेळी नामदेव राऊत,डॉ सुनील गावडे, बाळासाहेब महाडिक यांची भाषणे झाली. कर्जत शहरासह तालुक्यातील आठवडे बाजार सरकारने सुरू करावेत, अशी मागणी 
भारतीय जनता पक्षाचे किसान सेलचे सुनील यादव यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's 'Ram' at Godad Maharaj's door to open the temple