स्वस्त धान्याचा काळाबाजार; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सचिन सातपुते
Wednesday, 10 February 2021

शेवगाव शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयामागील केसभट वस्तीवरून मंगळवारी ट्रकमधून (एमएच 16 एई 3345) तांदळाच्या 60 गोण्या व 100 गोण्या गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी जात होता.

शेवगाव (अहमदनगर) : अमरापूर येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे स्वस्त धान्याचा काळाबाजार उघडकीस आला. ग्रामस्थांनी पकडलेल्या ट्रकमध्ये 30 क्विंटल तांदूळ व 50 क्विंटल गहू आढळून आला. प्रभारी पुरवठा निरीक्षक मधुकर चिंतामण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चिंतामण यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी प्रल्हाद दिनकर पवार (वय 38, रा. नवगण राजुरी, जि. बीड) व प्रदीप काळे (वय 35, रा. वडुले बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
शेवगाव शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयामागील केसभट वस्तीवरून मंगळवारी ट्रकमधून (एमएच 16 एई 3345) तांदळाच्या 60 गोण्या व 100 गोण्या गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी जात होता. अमरापूर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ ट्रक थांबला असता, नागरिकांना संशय आला. ट्रकची पाहणी केली असता, त्यात स्वस्त धान्य आढळून आले. याबाबत चालकाकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई सकाळचे ऍप 
 
नायब तहसीलदार व्ही. के. जोशी व प्रभारी पुरवठा निरीक्षक चिंतामण यांनी तेथे घटनास्थळी जाऊन मालाची पाहणी केली असता, शासकीय गहू व तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याचे लक्षात आले. चिंतामण यांनी 40 हजार रुपये किंमतीचा गहू व 60 हजार रुपये किंमतीचा तांदळाचा पंचनामा करीत ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिला. पवार व काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The black market of cheap foodgrains in amarpur has been exposed