
अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्याच्या सूचना या पथकासह स्थानिक पोलिसांना पाटील यांनी केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी तपासाबाबत सूचना केल्या.
नगर ः अमरावती येथील चार वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील पाच जणांच्या टोळीस जेरबंद केले. नयन मुकेश लुणिया (वय 4, रा. अमरावती) या मुलाची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका करण्यात आली.
हीना शाकीर शेख ऊर्फ हीना अनिकेत देशपांडे (वय 25), अल्मस ताहीर शेख (वय 18), आसिफ हिनायत शेख (वय 24), फैरोज रशीद शेख (वय 25, सर्व रा. कोठला, नगर), मुसाहीब नासीर शेख (वय 21, रा. मुकुंदनगर), अशी आरोपींची नावे आहेत.
अमरावतीचे पोलिस आले नगरला
अमरावती येथून नयन लुणिया याचे अपहरण झाल्याचा गुन्हा तेथील राजा पेठ पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. अमरावती शहर पोलिस आयुक्तांनी या गुन्ह्यातील आरोपींची माहिती नगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिली. अमरावती शहर पोलिसांचे पथक तपासासाठी येथे आले होते.
हेही वाचा - शिष्यवृत्ती परीक्षेतही कोरोनाचा आडवा पाय
अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्याच्या सूचना या पथकासह स्थानिक पोलिसांना पाटील यांनी केल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी तपासाबाबत सूचना केल्या.
गुप्त माहितीनुसार, पोलिस पथकाने हीना शेख, अल्मस शेख, मुसाहीब शेख यांना नगरमध्ये विविध भागांतून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग
अपहरण केलेला मुलगा हा असिफ शेख व फैरोज शेख यांच्याकडे असल्याचे सांगितले. पोलिस पथक आरोपींचा शोध घेत असताना, मुलाला घेऊन ते नगरहून कल्याण रस्त्याने गेल्याची माहिती मिळाली. मुलाला घेऊन दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी कल्याण रस्त्यावर पाठलाग केला. काही ग्रामस्थांच्या मदतीने मुलासह आरोपींना जेरबंद केले. आरोपींसह मुलाला अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.