esakal | Diwali Lakshmi Pujan 2020: लक्ष्मीपूजनाला केरसुणीचा मान कायम; परराज्यातून मागवावा लागतोय कच्चा माल
sakal

बोलून बातमी शोधा

The broom required for Lakshmi Puja on Diwali is from the other state

दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'लक्ष्मी' म्हणूनच केरसुणीचे पूजन केले जाते.

Diwali Lakshmi Pujan 2020: लक्ष्मीपूजनाला केरसुणीचा मान कायम; परराज्यातून मागवावा लागतोय कच्चा माल

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'लक्ष्मी' म्हणूनच केरसुणीचे पूजन केले जाते. यादिवशी केरसुणीला अनन्य साधारण महत्त्व आहे. परंतु कच्च्या मालाअभावी हा व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीत येऊ लागला आहे. केरसुण्या बनविण्यासाठी कच्चा माल परराज्यातून आणावा लागत आहे. तर काही विक्रेते इतर ठिकाणांहून तयार माल आणून शहर व ग्रामीण भागातील आठवडे बाजारामध्ये विक्री करत आहेत.

केरसुणीचे महत्त्व 
अस्वच्छतेमुळे आरोग्य बिघडते, लहान मुलं आजारी पडतात. त्यामुळे घरोघरी वापरली जाणारी केरसुणी घरात स्वच्छता ठेवून कुटुंबीयांचे आरोग्य जपण्याचे काम करते. त्यामुळे तिला 'लक्ष्मी' म्हणूनही संबोधले जाते. दिवाळीतील 'लक्ष्मी' पूजनादिवशी या केरसुणीला 'लक्ष्मी' समजून पूजा करण्याची परंपरा आहे.

व्यवसायावर परिणाम 
शहरातील सिमेंटच्या जंगलात गुळगुळीत फरशी आली आणि दारातील अंगण नाहीसे झाले. त्यामुळे अनेकांच्या घरात केरसुणी हद्दपार होते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. तरीही लग्न समारंभ अन् दिवाळीच्या निमित्ताने तिला चांगली मागणी आहे.

हेही वाचा :  झेंडूची विक्री वाढल्याने भाव वधारला; अकोलेत फुलं घेण्यासाठी ग्राहक बांधावर
पिढीजात व्यवसाय 

नेवासे शहरासह तालुक्यातील कुकाणे, वरखेड,तरवडी, देवगाव, भेंडे येथे 25 हून अधिक कुटुंबे केरसुणी बनविण्याचे काम करतात. हे कुटुंब पिढीजात पद्धतीने केरसुणी करत असले तरी हा व्यवसाय अडचणीत आला आहे. केरसुणीसाठी लागणार्‍या शिंदोळीच्या झाडांची पाने मिळत नसल्याने भटकंती करावी लागते. दिवाळीसाठी लागणार्‍या केरसुणी बनविण्यासाठी गौरी-गणपतीपासूनच सुरुवात केली जाते. नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी शहरासह आठवडे बाजारात केरसुणी विक्रेते दाखल झाले आहेत. बाजारामध्ये 60 ते 70 रुपये दराने 
या केरसुणीची विक्री होत आहे.

इतर ठिकाणांहून तयार माल
कच्चा माल नसल्यामुळे जिल्ह्यातील ठोक विक्रेते आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू येथून माल आणतात. व हा माल किरकोळ विक्रेते खरेदी करून ग्रामीण भागात विक्री करतात. यावर्षी झाडूला चांगली मागणी आहे. दिवाळी जशी जवळ येईल तशी मागणी वाढत जाईल, असेही या वेळी विक्रेत्यांनी सांगितले. याचबरोबर सूप, पाटी आदी मालही बाजारामध्ये विक्रीस आला आहे.

छोटी केरसुणी फ्री मिळणे झाले बंद
मालाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. पूर्वी मोठय़ा केरसुनीवर छोटी केरसुनी (बच्च) फ्रीमध्ये मिळत होते. आता या बच्चासाठीही 15-20 रुपये मोजावे लागत आहेत. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अशी बनवतात केरसुणी... 

शिंदोळीचा पाला उन्हात कडक वाळविला जातो. त्यानंतर त्या पाल्याचे काटे झाडून काढण्यात येतात. कडा मोडून बांधणी करण्यात येते. त्यानंतर बांधणीला पाला विंचरण्यात येतो. शेवटी तंगुसाने तो बांधण्यास सुरुवात केली जाते. एक केरसुणी तयार करण्यासाठी सरासरी अर्धा तास लागतो, त्या तुलनेत मोबदला मात्र फारसा मिळत नाही.

"शिंदोळीच्या झाडाचा पाला बाहेरगावाहून मागवावा लागतो. त्यामुळे कारागिरांना एका बंडलाला दोनशे-अडीचशे रुपये मोजावे लागतात. एका केरसुणीला 4 ते 5 फड लागतात. त्या बंडलातून 15-16 केरसुणी तयार होतात. एक केरसुणी होलसेल दरात 35-40 रुपयाला विकली जाते. दिवसभर कष्ट करूनही पाहिजे तसा मोबदला मिळत नाही. 
- विठ्ठल सरोदे, विक्रेते, जेऊर हैबती, ता. नेवासे.

संपादन : अशोक मुरुमकर