वाचवा...वाचवा...कुणी तरी वाचवा हो माझ्या भावाला! बहिणीचा टाहो आसमंतात विरला

The brother died under the container in front of the sister
The brother died under the container in front of the sister

शिर्डी ः "ती'ने फोडलेला हंबरडा मदतीसाठी धावलेल्यांचे काळीज चिरून गेला. धाकट्या भावाच्या कलेवरास बिलगून आक्रोश करणाऱ्या आणि क्षणात उभे राहून असहायपणे घरच्या मंडळींना हाका मारणाऱ्या बहिणीला सावरणे मुश्‍कील झाले. बोलता बोलता धाकटा भाऊ मालमोटारीच्या चाकाखाली अडकला. 15-20 फूट फरफटत जाऊन निपचित पडला. कोल्हार ते कोपरगाव राज्यमार्गाने आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास आणखी एक बळी घेतला. 

असा आला काळ
रोशन राजेंद्र गुजर (वय 22) हा शिर्डीतील युवक मोठी बहीण राणी हिला दुचाकीवर घेऊन घरी जात होता. एकमेकांशी बोलत दोघांचा प्रवास सुरू होता. सावळीविहीर येथे त्यांना कंटेनरचा हलका धक्का बसला. त्यात दोघेही दुचाकीवरून खाली पडले. रोशन कंटेनरच्या चाकाखाली अडकला. 15-20 फूट फरफटत जाऊन रस्त्यावर निपचित पडला. रस्त्यावरील लोक मदतीसाठी धावले.

एका बाजूने दबल्याने विद्रूप झालेले भावाचे कलेवर पाहताच राणीने हंबरडा फोडला. ती त्याच्या कलेवराला कुरवाळीत आक्रोश करू लागली. थरकाप उडविणारे हे दृश्‍य पाहून मदतीला धावलेले सर्व जण क्षणभर सुन्न होऊन थबकले. 

भाऊ चाकाखाली अडकला

रस्त्याच्या कडेला पडलेल्या राणीच्या डोळ्यांसमोर तिचा भाऊ रोशन कंटेनरच्या चाकाखाली अडकला. काही समजण्यापूर्वीच चिरडून ठार झाला. हे भयानक दृश्‍य प्रत्यक्ष पाहिल्याने आक्रोश करणाऱ्या राणीला समजाविणे मुश्‍कील झाले. एव्हाना रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. बघ्यांची गर्दी जमली. थरकाप उडविणारे दृश्‍य पाहून अनेकांनी तेथून दूर जाणे पसंत केले. 

योगायोगाने कोपरगाव येथील पत्रकार नानासाहेब जवरे तेथून जात होते. त्यांनी राणीला कसेबसे सावरले. शिर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना फोन केला. तोपर्यंत मदतीला धावलेल्या लोकांनी रोशनच्या मृतदेहावर चादर पांघरली. काही वेळात रुग्णवाहिका आली. मृतदेह घेऊन गेली. रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली. आणखी किती बळी गेल्यावर संवेदनाहीन सरकारी यंत्रणेचे डोळे उघडणार आहेत, हा प्रश्न तसाच राहिला. अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com