esakal | म्हैस बाजार अन्‌ तोही ऑनलाइन कधी ऐकलंय का? पण हे खरंय! ‘येथे’ भरतोय ‘असा’ बाजार
sakal

बोलून बातमी शोधा

Buffaloes are being bought and sold online in Ghodegaon in Nevasa taluka

कोरोनामुळे संपूर्ण जग बदलत आहे. अनेक व्यवसायांवर याचा परिणाम झाला आहे. त्यातच सध्या ऑनलाइन व्यहवारावर भर दिला जात आहे.

म्हैस बाजार अन्‌ तोही ऑनलाइन कधी ऐकलंय का? पण हे खरंय! ‘येथे’ भरतोय ‘असा’ बाजार

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : कोरोनामुळे संपूर्ण जग बदलत आहे. अनेक व्यवसायांवर याचा परिणाम झाला आहे. त्यातच सध्या ऑनलाइन व्यहवारावर भर दिला जात आहे. मोबाईलसह इतर घरगुती वस्तू ऑनलाईन मागवणे यात सध्या काय विशेष वाटत नाही. पण जनावरांचा बाजार ऑनलाईन भरला तर आहे ना विशेष!. देशात प्रसिद्ध असलेला घोडेगाव येथील म्हशींचा बाजार सध्या ऑनलाईन सुरु आहे.
 

नगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे राज्यासह परराज्यातील म्हशी खरेदी- विक्रीसाठी येतात. दर शुक्रवारी येथे जनावरांचा बाजार भरतो. खास म्हशींसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे. दिल्ली, मध्यप्रदेश, हरियाणा, गुजरात, राज्यस्थान आदी भागातून व्यापरी आणि शेतकरी येथील बाजारात येतात. साखर कारखान्यांचे गळीत हंगाम, पावसाळा, हिवाळा, रमझान व बकरी ईद अशा महत्त्वाच्या काळात येथील बाजारात विविध जातींच्या जनावरांची आवक वाढते. साधारण दर बाजारावेळी कोट्यावधी रुपयांची उलाढाल येथे होते. मात्र कोरोनामुळे येथील उलाढाल ठप्प आहे
 

जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या नेवासे तालुक्यातील या घोडेगावात म्हैस विक्रीचे विक्रम केले आहेत. लाखो रुपयांपर्यंत म्हशीची किंमत गेली आहे. म्हशी बघण्यासाठी अनेकजण येथे गर्दी करत. देशभरातून घोडेगावच्या म्हशीच्या बाजारात जातिवंत म्हशींची खरेदी व विक्री होते. बैल, म्हशी, विविध प्रकारच्या गायी तसेच कांदा बाजार असा व्यापार घोडेगावात होतो.

बाजारात म्हसाण, मुऱ्हा, जाफराबादी, गावरान, पंढरपुरी, शिंगाळू, सुरत, नेहसना अशा म्हशींच्या जाती खरेदी-विक्रीसाठी येतात. या बाजारात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड, हरियाना, दिल्ली, गुजरात, आंध्र, कर्नाटक, केरळ येथून व्यापारी व खरेदीदार येतात. अनेक राज्यात घोडेगावातून जनावरे जातात. कर्नाटकमध्येही खूप जनावरे येथून जातात.
 

कोरोनामुळे सध्या बाजार भरत नाही. मात्र, ज्यांना जनावरे विकायची आहेत. ते त्यांचे व्हिडीओ करुन संबंधीतांना पाठवतात. त्यानंतर संबंधीत व्हिडीओ पाहून किंमत ठरवात. समजा म्हैस असेल आणि ती जर खरेदीदारांला पसंद पडली असेल तर किंमत ठरवून तिला पाहण्यासाठी जातात. त्यानंतर व्यहवार केले जातात, असे येथील व्यापारी समीर पठाण सांगत आहेत.
 

नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उप बाजारात भरत असलेल्या म्हशीच्या बाजारात जनावरांसह शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र सध्या कोरोनामुळे आवारात समितीकडून बाजार बंद आहे. बंदच्या काळात काहीजण ऑनलाईन खरेदी- विक्री व्यवहार करत असल्याची माहिती आहे. पण प्रत्येक्षात व ऑनलाईन जनावरे खरेदीत मोठा फरक असतो. प्रत्येक्ष खरेदी विक्रीत खरेदी करणारास प्रत्येक्ष जनावर पाहून खात्रीशीर व्यवहार करता येतो तसे ऑनलाईन व्यवहारात होत नसल्याचे बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले.
 

येथे विविध राज्यातून व्यापारी येतात. अनेक शेतकरीही म्हैस विक्रीव व खरेदीसाठी येतात. मात्र, एखाद्यावेळी मनासारखी किंमत मिळाली नाही तर दुसऱ्या बाजारापर्यंत त्याला थांबण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे संबंधीतांचा खर्च वाचतो, त्यामुळे या बाजाराला पसंदी दिली जाते, असे पत्रकार सुनील गर्जे यांनी सांगितले.