esakal | बंदी असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन; सात जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime

बंदी असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन; सात जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पारनेर (जि. नगर) : राज्यात बैलगाडा शर्यतींना बंदी आहे. असे असतानाही तालुक्यातील शिरापूर येथे कोरोना नियमांना हरताळ फासत सुमारे दोन हजारांवर जमाव जमवून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीची माहिती मिळताच तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तहसीलदार आल्याचा सुगावा लागताच आयोजकांसह प्रेक्षकांनीही पोबारा केला. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून सात जणांविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (bullock-cart-race-despite-ban-filed-charges-against-seven-people)

कोरोना प्रादुर्भावामुळे जमावबंदी व शर्यतीवरील बंदीचे नियम धाब्यावर बसवून शिरापूर येथे बैलगाडा शर्यत घेण्यात आली. या शर्यतीची माहिती तहसीलदार देवरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी शिरापूर येथे धाव घेतली. तहसीलदार आल्याचा सुगावा लागताच संयोजकांसह शर्यत पाहण्यासाठी आलेल्यांनी तेथून पोबारा केला. मात्र, तोपर्यंत शर्यती सुरू असल्याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले होते. त्याच व्हिडिओच्या आधारे तहसीलदारांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

घटनास्थळी तहसीलदार देवरे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे यांनी भेट दिली. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी मीना जनार्दन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुंडा भोसले, संभाजी नरसाळे, संतोष शिणारे, संतोष गुंजाळ, दत्ता ताठे (रा. शिरापूर) व अर्जुन लामखडे, रूपेश लामखडे (रा. निघोज) यांच्या विरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन, प्राणी छळवणूक कायदा कलम ११(१) या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तेथे मिळालेल्या रजिस्टरमध्ये ५६ व्यक्तींची नावे आहेत. त्यांनी ही शर्यत आयोजित केल्याचा संशय असून, त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे उपनिरीक्षक बोत्रे यांनी सांगितले.

हेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव

शिरापूर येथे बैलगाडी शर्यत सुरू असल्याची माहिती मिळताच तेथे गेलो; मात्र तोपर्यंत शर्यत संपली होती. मात्र, शर्यती झाल्याच्या खुणा दिसून आल्या. रजिस्टर व ग्रामपंचायतीच्या शिपायाच्या मोबाईलमध्ये बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ आढळून आले. त्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर

(bullock-cart-race-despite-ban-filed-charges-against-seven-people)

हेही वाचा: नगर जिल्ह्यात १३३ गावांमध्ये दीड वर्षांनी वाजली शाळेची घंटा

loading image