बस आली पाकिस्तानच्या सीमेजवळून 

दौलत झावरे
मंगळवार, 26 मे 2020

पारनेर ते लुकनसर असा तीन हजार किलोमीटरचा प्रवास होता. त्यासाठी पंढरीनाथ भालेराव व जगन्नाथ कंठाळे या दोन चालकांची नियुक्ती करण्यात आली होती

नगर : राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागाची बस पाकिस्तानच्या सीमेपासून शंभर किलोमीटर आत असलेल्या लुकनसर (राजस्थान) येथील प्रवाशांना सोडून परत आली आहे. 

 

अवश्य वाचा ः परजणे म्हणतात... जिल्हा परिषदेची सभा बेकायदेशीर

राज्यासह परराज्यांतील अडकलेले मजूर व इतरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. राजस्थान राज्यातील लुकनसर येथील 22 जण नगर जिल्ह्यात आले होते. सध्या कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्याने त्यांना त्यांच्या राज्यात जायचे होते. यासाठी त्यांनी महसूल विभागाकडे अर्ज करून परवानगी घेतली. त्यानंतर एसटी महामंडळाकडे नियमाने पैसे भरून पारनेर ते लुकनसर या मार्गासाठी बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. 

 

हेही वाचा : पाहुण्यांची धडकी भरली...

विभागनियंत्रक विजय गिते यांनी तातडीने या सर्वांना बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना पारनेर आगारप्रमुखांना दिल्या. पारनेर ते लुकनसर असा तीन हजार किलोमीटरचा प्रवास होता. त्यासाठी पंढरीनाथ भालेराव व जगन्नाथ कंठाळे या दोन चालकांची नियुक्ती करण्यात आली होती.

 

या दोघांनी लुकनसर येथे प्रवाशांना नेऊन सोडून पुन्हा पारनेर गाठले. त्यासाठी त्यांना पाच दिवस लागले. जिल्ह्यातून पाकिस्तानच्या सीमेजवळ जाऊन एसटी येण्याची चालकांच्या कारकिर्दीतीलही ही पहिलीच घटना आहे. 

सर्वांचे अाभार ः गिते

इंडियन ऑइलच्या मदतीने बसला डिझेल व चालकांना जेवण, राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी महावीर ऑटो यांनी सहकार्य केले. 
- विजय गिते, विभागनियंत्रक, नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bus came from the border of Pakistan