श्रीगोंद्यात पकडला स्वस्त धान्य दुकानातील माल, तरूणांचे धाडस

संजय आ. काटे
Monday, 17 August 2020

अनिल वीर यांनी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली मात्र हा विषय महसूलचा असल्याने थेट गुन्हा नोंदविता येणार नसल्याने पोलिसांनी सांगितले. 

श्रीगोंदे : तालुक्यातील येळपणे येथील एकाच चालकाकडे असणाऱ्या स्वस्त धान्याच्या दोन दुकानातील 88 पोते गहू व तांदूळ काळ्याबाजार विक्रीसाठी जात असताना तरुणांनी टेम्पो रविवारी रात्री पकडला.

हेही वाचा - नीलेश राणेंना कोरोनाची लागण, रोहित पवारांचे ट्विट

बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात धान्य, टेम्पो व संबधीत व्यक्ती दिले. पोलिसांनीही हे सगळे महसूलच्या ताब्यात दिले. मात्र आज उशिरापर्यंत याबाबत फिर्याद दाखल झाली नव्हती. 

येळपणे येथून स्वस्त धान्याचा जाणारा टेम्पो येळपणे व पिसोरे येथील तरुणांनी पकडला. माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल वीर, सतीश वीर, गणेश पवार, दत्तात्रेय लकडे, दत्तात्रेय देशमुख, कुणाल लकडे, सुदाम जाधव, किरण मांढरे, परमेश्वर जाधव, ऋषभ खामकर यांनी टेम्पो, त्यातील धान्य व हे घेवून जाणारे व्यक्ती बेलवंडी पोलिसांच्या हवाली केले.

अनिल वीर यांनी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली मात्र हा विषय महसूलचा असल्याने थेट गुन्हा नोंदविता येणार नसल्याने पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान पोलिसांनी हा सगळा मुद्देमाल आज सकाळी महसूलच्या पुरवठा विभागाकडे हवाली केला. महसूलचे लोक दिवसभर सदर दुकानदाराची चौकशी करीत होते. येळपणे व पोलिसवाडी येथील दोन दुकाने एकाच व्यक्तीकडे आहेत. हे दोन्हीही दुकाने सील करुन पंचनामा सुरु होता. उशिरापर्यंत बेलवंडी पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता. 

महसूल यंत्रणा दिवसभर पंचनामा करण्यात गुंतली होती. आम्ही त्यांच्या हवाली सगळे केले आहे. त्यांची फिर्याद उशिरा येणार असल्याचे समजते. फिर्याद आल्यावर गुन्हा दाखल होईल. 
- अरविंद माने, पोलिस निरीक्षक, बेलवंडी पोलिस ठाणे.

बेलवंडी पोलिसांनी ताब्यात दिलेल्या टेम्पोतील 88 पोते गहू व तांदूळ येळपणे व पोलिसवाडी येथील स्वस्त धान्य दुकानातीलच आहे. याबाबत पोलिसात फिर्याद देण्याचे सांगितले असून संबधीत दुकाने सील केली आहेत. 
-चारुशिला पवार, प्रभारी तहसीलदार श्रीगोंदे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheap grain store goods seized in Shrigonda