esakal | संभाजीराजे उद्या कोपर्डीत, घोषणेकडे समाजाचे लागले लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीराजे छत्रपती

संभाजीराजे उद्या कोपर्डीत, घोषणेकडे मराठा समाजाचे लागले लक्ष

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील निर्भया प्रकरणामुळे मराठा समाजाचे मोठे आंदोलन पेटले होते. मराठा क्रांती मोर्चाचाही यातूनच जन्म झाला. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे. समाजातील लोकांनी निर्भयाचे स्मृतिस्थळ उभारले आहे. येथे केवळ मराठा समाजातीलच नव्हे तर इतर सामाजिक संघटना येतात. हे गाव पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती हे उद्या (ता १२) कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कोपर्डी येथे निर्भयाच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहे. त्यानंतर ते ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. नंतर कर्जत येथे सकल मराठा समाजाच्या संघटनांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे.(Chhatrapati Sambhaji Raje will visit Kopardi tomorrow)

हेही वाचा: मराठा क्रांती मोर्चात जमलेल्या कोट्यवधी रूपयांचे काय झालं?

मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या मागण्यांबाबत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर ज्या कोपर्डीतून मराठा ऐतिहासिकरीत्या एकवटला त्या कोपर्डीत संभाजीराजे उद्या दुपारी २ वाजता भेट देणार आहेत. पीडितेचे कुटुंबीय व कोपर्डी ग्रामस्थ आणि समाज कार्यकर्त्यांशी संवाद साधून संभाजीराजे पुन्हा एकदा मराठ्यांच्या निर्णायक लढ्याचे रणशिंग फुंकतील.

कोपर्डीत खासदार संभाजीराजेंसोबत राज्यातील सर्व प्रमुख समन्वयक व मराठा संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अहमदनगर जिल्हा व लगतच्या जिल्ह्यांतील मराठा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोपर्डी प्रकरणानंतर राज्यभरातील मराठा समाज एकवटला. शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यात आले. या मोर्चासाठी कोणाचेही नेतृत्व नव्हते. मात्र, आता संभाजीराजे छत्रपती पुढे आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली समाज पुन्हा एकवट्यास सुरूवात झाली आहे. राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच न्यायालयाने रद्द केल्याने मराठा समाज पुन्हा चवताळला आहे.

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी निर्भयाच्या आई-वडिलांची मागणी आहे. या प्रकरणातील आरोपींनी वरच्या कोर्टात दाद मागितली आहे. हे प्रकरण पुन्हा माध्यमांच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. (Chhatrapati Sambhaji Raje will visit Kopardi tomorrow)