चितळे रस्ता ते लक्ष्मीकारंजा परिसर झाला कंटेन्मेंट झोन 

अमित आवारी
Sunday, 12 July 2020

शहरातील लक्ष्मीकारंजा परिसरातील एका गल्लीत कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगर : शहरातील लक्ष्मीकारंजा परिसरातील एका गल्लीत कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील कंटेन्मेंट झोनची संख्या वाढली आहे. या परिसरात उद्या (सोमवार)पासून महापालिका प्रशासनाकडून सशुल्क जीवनावश्‍यक वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे. 

अवश्‍य वाचा - नगरमध्ये 303 कोरोना बाधित रुग्ण 

शहरात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात काल (शनिवारी) 90 तर आज दुपारपर्यंत 50 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंता वाढलेल्या आहेत. चितळे रस्ता व लक्ष्मीकारंजा परिसरातील एका गल्लीत कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्याचा निर्णय महापालिका आयुक्‍तांनी आज घेतला. त्यानुसार चितळे रस्ता, मिरावलीबाबा दर्गा चौक, लक्ष्मीबाई कारंजा, चित्रा टॉकीज, अहमदनगर जिल्हा वाचनालय, चितळे रस्ता, मिरावलीबाबा दर्गा चौक हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये महापालिका व पोलिस कर्मचाऱ्यांना जाण्या-येण्या पुरता रस्ता ठेवण्यात आला आहे. 25 जुलै दुपारी दोन वाजेपर्यंत हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात येईल. 

पापय्या गल्ली, रंगारगल्ली, पटवर्धन चौक, धनगरगल्ली, महाजन गल्ली, घुमरे गल्ली, गांधी मैदान, नवीपेठ, नेतासुभाष चौक, जगदीश भुवन मिठाईवाले हॉटेल पाठीमागील परिसर, कुंभारगल्ली, जुनी छाया टॉकीज परिसर, नेहरू मार्के ते पटवर्धन चौक हा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या बफर झोनमध्ये जीवनावश्‍यक वस्तूं व्यतिरिक्‍त सर्व दुकाने बंद राहतील. शहरात सध्या तोफखाना, सिद्धार्थनगर, पद्मानगर, बागरोजा, आयटीआय कॉलेज समोरील नंदनवन कॉलनी हे परिसर सध्या कंटेन्मेंट झोन आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chitale Road to Laxmikaranja area became a containment zone