
अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली खरिपातील पिके वाया गेली. शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन खर्चही पडला नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या नजरा रब्बीकडे लागल्या होत्या.
नेवासे (अहमदनगर) : ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या वातावरणामुळे ज्वारीवर काही प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीने 'अटॅक' केला आहे. तसेच ढगाळ हवामान आणखी काही दिवस राहिल्यास गहू, हरभरा पिकांवरही रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली खरिपातील पिके वाया गेली. शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन खर्चही पडला नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या नजरा रब्बीकडे लागल्या होत्या. दमदार पावसामुळे तालुक्यात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी रब्बीत गहू, हरभरा, ज्वारी पिकांवर भर दिला. तालुक्यात ज्वारीचे 2 हजार हेक्टर क्षेत्र आहे. सुरवातीला पेरणी उरकलेल्या ज्वारीची वाढ चांगली झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच, काही दिवसांपासून पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवर औषधफवारणी करण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा मार्ग नाही. परंतु, औषधांच्या किंमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. एकरी दीड हजारांचा खर्च येत असल्याने, उत्पादन हाती येण्यापूर्वीच शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
हे ही वाचा : आली आली आली नगरमध्ये कोरोना लस आली
रोगाला असे करा नियंत्रित
कृषी सहायकांच्या मदतीने तातडीने उपाययोजना सुचविल्या जात आहेत. कामगंध सापळ्यासह एकात्मिक कीड व्यवस्थापनसह क्लोरो अंट्रानिलीप्रोल 18.5 एस.सी.अथवा नोमुरिया रिलेयी 4 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून मिसळून फवारणी केल्यास, या किडीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. या अळीचा प्रसार रोखण्यासाठी नर पतंग पकडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी फेरोमोन सापळे शेतात लावण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा : जिल्हा परिषद कागदोपत्री सतर्क; भंडाऱ्याच्या घटनेनंतर पळापळ, फायर ऑडिटसाठी जुळवाजुळव
अळीच्या डोक्यावर उलटा 'वाय' आकारातील चिन्ह दिसते. शेवटच्या भागावर काळे चार ठिपके असतात. त्यावरून ही अळी ओळखता येते. अळीची वाढ पूर्ण होण्यासाठी 15-16 दिवस लागतात. पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जमिनीत जाते. सात-आठ दिवसांतून त्यातून पतंग बाहेर पडतो. किडीचा जीवनक्रम 25-30 दिवसांत पूर्ण होतो. नर पतंग व मादीच्या मिलनातून पुन्हा अंडीपुंज तयार होऊन एका पुंजातून 7-8 अळी तयार होतात.
- दत्तात्रेय डमाळे, तालुका कृषी अधिकारी, नेवासे