CM शिंदे शेतकऱ्यांना दिलेला वायदा २१ तारखेपर्यंत पूर्ण करणार ?

अहमदनगर जिल्ह्यासह यावेळी राज्याला पुन्हा एकदा गारपिटीने झोडपले.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal

गा रपीट, अवकाळी पाऊस, वादळवारं, हे आता काही नवीन राहिलं नाही. नैसर्गिक आपत्तीची सर्वांत मोठी झळ शेतकऱ्यांनाच बसते. काही तासांत होत्याचं नव्हतं होतं. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो, तरीही शेतकरी रडत नाहीत, लढत राहतो. सरकारकडे हात पुढे करण्याची वेळ येते, आश्वासन मिळते, मुख्यमंत्री, खासदार, आमदार सगळे झाडून पुसून शेतकऱ्यांच्या बांधावर जातात; पण त्याला जे नुकसान होते, त्याची भरपाई कधीच आणि वेळेवर होत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

अहमदनगर जिल्ह्यासह यावेळी राज्याला पुन्हा एकदा गारपिटीने झोडपले. शेतातील पिकं आडवी झाली. चांगला पाऊसपाणी झाल्याने रब्बी हंगाम चांगला जाईल, ही आशा आणि कांदा, गहू, तसेच इतर पिके हाती लागल्याने शेतकरी आनंदी होता. मात्र, या आनंदावर विरजण पडले. गारपिटीने दाणादाण उडाली. आपत्तीची सवय शेतकऱ्यांना झाली आहे. तरीही, सातत्याने किती वेळा संकटं झेलत राहायची? विमा असो किंवा सरकारी योजना; त्या कधीच शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाहीत किंवा त्यांचा लाभही घेता येत नाही.

विखे पाटील मदतीला धावले

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संकटात तातडीने शेतकऱ्यांच्या मदतीला धावले. प्रशासनाला योग्य त्या सूचना देताना मदत कशी मिळेल, हे पाहिले. तसेच, विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात असतील किंवा आमदार नीलेश लंके; त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मदतीसाठी विनंती केली. येथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की सरकार कोणत्याही पक्षाचे असो; पक्षभेद विसरून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सत्ताधारी आणि विरोधक घेत आहेत, हेही महत्त्वाचे आहे.

आज जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना मदत मिळण्याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारणही नाही. मात्र, माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे तरुण नेते प्राजक्त तनपुरे यांनी असे म्हटले आहे, की वर्षभरापूर्वीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. असे जर असेल, तर ही बाबही गंभीरच आहे.

मागचे पैसे जमा झाले नाहीत, तर यावेळचे आठवड्यात कसे जमा होणार, हाही प्रश्नच आहे. खरं पाहिलं, तर शेतकऱ्यांची सरकारकडे ही थकबाकीच आहे. मुख्यमंत्र्यांनी एक आठवड्यात मदत मिळण्याचे आश्वासन दिले आहे, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २१ तारखेचा वायदा पाळतात की नाही, हे पाहावे लागेल.

जर मायबाप सरकार दिल्या वचनाला जागले नाही, तर तुम्हीच ठरवा २१ तारखेनंतर काय करायचं !

सर्वपक्षीय नेत्यांचे स्वागत

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जिल्ह्यावर जेव्हा संकट येतं, शेतकरी अडचणीत सापडतो, तेव्हा सर्व पक्षांचे नेते एकदिलाने त्यांच्या पाठीशी उभे राहतात. एरवी त्यांचे राजकारण काही असो, ते एकमेकांवर कितीही आरोप-प्रत्यारोप करोत, अशा वेळी मात्र हे सुसंस्कृत नेते बांधावर जातात. मदतीची हमी देतात, हेही नसे थोडके.

...तर हाही इतिहास होईल!

अहमदनगर जिल्ह्यातील गारपिटीची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत पैसे जमा करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. आठवडाभरात खरंच तसं झालं, तर हाही इतिहास होईल. शिंदे सरकार खरंच गतिमान आहे, यावर लोकांचा विश्‍वास बसेल. मुख्यमंत्र्यांना शेतकरी दुवा देतील. मायबाप सरकारचे उपकार तो कधीच विसरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com