Coffee With Sakal : गावागावांत गोशाळा व्हाव्यात; गायकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coffee With Sakal

Coffee With Sakal : गावागावांत गोशाळा व्हाव्यात; गायकर

अहमदनगर : ‘‘आई हा शब्द गायीनेच दिला. गायीचे महत्त्व जाणून गावोगावी गोशाळा होण्याची गरज आहे. गाय-वासराला कॉंग्रेस विसरल्याने जनताही त्यांना विसरली,’’ असे सांगत, भारतीय संस्कृतीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न डावे करीत असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी केला.गायकर यांनी आज सकाळ कार्यालयाला भेट देत संपादकीय टीमशी संवाद साधला. आवृत्तीप्रमुख प्रकाश पाटील यांनी गोधन हा विशेष अंक, तसेच आई या विषयावरील दिवाळी अंक भेट देऊन गायकर यांचे स्वागत केले. विश्व हिंदू परिषदेची वाटचाल, रामजन्मभूमी, भारतीय संस्कृतीत गायीचे महत्त्व आदी विषयांवर गायकर यांनी मनमोकळा संवाद साधला.

हेही वाचा: प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा - HC

ते म्हणाले, की खरं तर गायीला राष्ट्रमातेचा दर्जा दिला पाहिजे. गोवंशहत्या होऊ नये, यासाठी कायदाही आहे; परंतु गायींची कत्तल होते. हे पाहवत नाही. केवळ कत्तलखान्यांवर कारवाया करून थांबता येणार नाही. गायींना विकणाऱ्या गोपालकांनीही गायीविषयीची भावना चांगली समजून घेतली पाहिजे. त्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. हे काम कोण्या एका संस्थेचे किंवा संघटनेचे नाही, तर समाजातील सर्व घटकांनी त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.

मुस्लिमांकडेही गोशाळा

कीर्तनकारांनीही प्रत्येक कीर्तनातून गायीचे महत्त्व विशद केले पाहिजे. गायीचे दूध, शेण, गोमूत्र पवित्र आहे, हे विज्ञानानेही सिद्ध केले आहे. अनेक आजार यामुळे बरे होतात. कोरोना काळातही गोमूत्राचा वापर करण्यात आला. गावरान गायींचे पालन-पोषण आवश्यक आहे. पालघरमध्ये बहुतेक कारखान्यांनी आपल्या परिसरात गायी पाळल्याचे दिसून येत आहे. हे चांगले द्योतक आहे. गाय फक्त हिंदूंनीच पाळली असे नाही, तर सर्वधर्मीय गायींना महत्त्व देत आहेत. भारतात अनेक मुस्लिमांकडेही गोशाळा आहेत, हेही दुर्लक्षून चालणार नाही.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

हिंदू धर्म विज्ञानावर आधारित

हिंदू संस्कृती मोठी आहे. हिंदू धर्म केवळ धर्म नाही, तर ती एक विचारधारा आहे. विहिंपचे काम म्हणजे खडतर मार्ग आहे. या मार्गाने चालण्यातच देशाचे हित आहे. ही नाळ सोडली, तर भारत हा भारत राहणार नाही. विहिंपच्या कार्यकर्त्यांनी केवळ हिंदूंचेच नव्हे, तर सर्वधर्मीयांसाठी काम केले आहे. या कार्यकर्त्यांकडे समानतेचा विचार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असेही गायकर यांनी सांगितले.

अयोध्येचा निर्णय म्हणजे सत्याचा विजय आहे. न्यायाच्या आधारावर आम्ही लढलो. हे केवळ आपलेच यश नाही, तर पूर्वीही अनेक संत-महंतांनी राममंदिर होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ती चळवळ सुरूच ठेवल्यामुळे हे सर्व शक्य झाले. राष्ट्र हे मंदिर आहे, त्याच्या कळसावर संस्कृती आहे. त्यामुळे संस्कृतीला विसरून चालणार नाही. अयोध्येत राममंदिर होणे, ही या पिढीची मोठी उपलब्धी आहे, असे गायकर यांनी सांगितले.

नोकरी सोडून बनलो कार्यकर्ता

विश्व हिंदू परिषदेचे काम म्हणजे एका विचाराने प्रेरितच व्हावे लागते. मी चांगली नोकरी सोडून विहिंपमध्ये स्वतःला वाहून घेतले. राष्ट्र वाचविण्याचा, वाढविण्याचा हा विचार आहे. आजची तरुण पिढीही या विचाराने प्रेरितच होऊन या परिषदेत येत आहे. चांगली राष्ट्रनिर्मिती, चांगला विचार, गोवंश टिकविणे, हिंदू संस्कृतीचे जतन, हे महत्त्वाचे काम विहिंप करीत असल्याचे गायकर यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top