आता केंद्राकडूनच महाराष्ट्रावर कौतुकाची थाप; विरोधाला विरोध न करता कोरोनाच्या विषयावर तरी सहकार्याची भूमिका घ्या

अशोक मुरुमकर
Friday, 13 November 2020

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून संसर्ग रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना करत आहे.

अहमदनगर : महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून संसर्ग रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना करत आहे. त्याला विरोधी पक्षानेही सहकार्य केले. काही दिवसांनी मात्र विरोधी पक्ष भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या उणीवांवर बोट ठेवायला सुरुवात केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर पडावे म्हणूनही त्यांच्यावर अनेकदा टिका झाली. मंदिरे उघडण्यावरुन सरकारवर टीका होत आहे. अशा स्थितीतही महाराष्ट्राचे कोरोनाबाबत चांगले काम आहे, असं सांगत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकतेच कौतुक केले. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.

गेल्यावर्षी महाराष्ट्रात कोणालाही वाटले नव्हते अशाप्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. सर्वाधीक जागा भाजपला मिळाल्या असतानाही त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले. भाजप सरकारवर टीका करण्याची कोणतीच संधी सोडत नाही. त्याला अनेकदा सरकारकडून उत्तरही दिले जाते. कोरोनाच्या काळात सरकारवर लक्ष ठेवण्याचे काम विरोधी पक्षाने केले. अनेकदा सरकारच्या कामकाजावर टीकाही केली. त्याला सरकारमधील मंत्र्यांनी वेळोवेळी उत्तरेही दिली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अशातच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्राचे कौतुक केले होते. याबाबत एका संकेतस्थळावर वृत्तही प्रसिद्ध झाले होते. यावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘मविआ सरकारच्या कामाबाबत राज्यातील सर्वसामान्य नागरीक समाधानी आहेतच. पण आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनीही कौतुकाची थाप टाकली आहे. त्यामुळं यापुढंतरी राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोधाला विरोध न करता कोरोनाच्या विषयावर तरी सहकार्याची भूमिका घ्यावी.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशातील सात राज्यांचा आढावा घेतला. या बैठकील महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते. कोरोना नियंत्रणासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणे, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर तसेच मास्कच्या दरांवर नियंत्रण, खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणे, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’ यासारखे चांगले व अभिनव निर्णय महाराष्ट्राने घेतले आहेत. हे निर्णय अन्य राज्यांसाठी उपयुक्त ठरतील, अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congratulations from Central Health Minister Harshvardhan Government of Maharashtra