राहुल गांधींना धक्काबुक्की म्हणजे देशात हुकूमशाही : आमदार डॉ. तांबे

आनंद गायकवाड
Friday, 2 October 2020

कोणत्याही चर्चेविना पास झालेले कृषी विधेयक शेतकर्‍यांना पूर्णपणे उध्वस्त करणारे असून यामुळे शेतीमालाचा भाव उद्योजकांच्या मर्जीवर राहणार आहे

संगमनेर (अहमदनगर) : कोणत्याही चर्चेविना पास झालेले कृषी विधेयक शेतकर्‍यांना पूर्णपणे उध्वस्त करणारे असून यामुळे शेतीमालाचा भाव उद्योजकांच्या मर्जीवर राहणार आहे. तसेच नव्या कामगार कायद्यामुळे कामगार रस्त्यावर येणार आहे. हाथरसची दुर्दैवी घटना, काँग्रेस नेत राहुल गांधींना झालेली धक्काबुक्की म्हणजे देशात हुकूमशाही येत असल्याचे द्योतक असल्याची टीका आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली. संगमनेर बसस्थानकासमोरील महात्मा गांधी यांच्या तैलचित्रासमोर झालेल्या निदर्शनात ते बोलत होते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आमदार डॉ. तांबे म्हणाले, भाजपा सरकारच्या काळात देशात अराजकता वाढीस लागली असून, अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. कृषी प्रधान भारतात नव्या कृषी कायद्याने शेतकरी उध्वस्त होणार आहे. तर नव्या कामगार कायद्याने भांडवलदारांच्या ताब्यात कामगारांचे जीवन दिले आहे. केंद्राच्या या दोन्ही काळया कायद्याने शेतकरी व कामगार अस्वस्थ झाले असून, हे दोन्ही कायदे तातडीने मागे घ्यावेत. तसेच हाथरस घटनेतील आरोपींना तातडीने फाशी द्यावी. भाजपा सरकारने आता जाहिरातबाजी सोडून प्रत्यक्ष काम केले पाहिजे. देशात वाढलेली जातीय तेढ, असुरक्षितता हा अत्यंत चिंतेचा विषय असून प्रत्येक नागरिकाने केंद्राच्या चुकीच्या धोरणांबद्दल आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, इंद्रजित थोरात, गणपतराव सांगळे, प्रा. बाबा खरात आदींनी विचार व्यक्त केले.

हेही वाचा : राहुल गांधींच्या अटकप्रकरणी राहुरीत काँग्रेसतर्फे रस्ता रोको आंदोलन
तालुका काँग्रेसच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाने घोषणा देत सुरु झालेल्या निदर्शनाची नवीन नगर रोडवरील सभेने समाप्ती झाली. या वेळी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, मिरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, निशा कोकणे, शंकर खेमनर, निर्मला गुंजाळ, संतोष हासे, आर. एम. कातोरे, अजय फटांगरे, सीताराम राऊत, सुरेश झावरे, नवनाथ अरगडे, अ‍ॅड.त्र्यंबकराव गडाख, सोमेश्‍वर दिवटे, निखील पापडेजा, सुभाष सांगळे, अर्चना बालोडे, सुरेश थोरात आदि उपस्थित होते. यावेळी मोदी व योगी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी निवेदन स्विकारले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress agitation in Sangamner over incident in Uttar Pradesh