
महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही कुठलीही उपाययोजना व लिकेज दुरुस्तीचा प्रयत्नही केला नाही.
नगर : महापालिकेच्या जलवाहिनीतून मैला, रक्तमिश्रीत, तसेच प्राण्यांच्या अवयवांचे तुकडे असणाऱ्या पाण्याचा शहरातील 50 हजार कुटुंबांना पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नगरसेवक गणेश भोसले यांनी आज शहरातील दोन ठिकाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. गळतीच्या ठिकाणी हे दूषित पाणी वाहिनीत जात असल्याचे समोर आले.
महापालिकेच्या 900 एमएम सिमेंट पाइपलाइनद्वारे 1972पासून शहरातील सारसनगर, भोसले आखाडा, रेल्वेस्टेशन रस्ता, आगरकर मळा, कायनेटीक चौक, दौंड रस्ता, माणिकनगर, माळीवाडा, टिळक रस्ता परिसरातील 50 हजार कुटुंबांना वसंत टेकडी येथून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या 20 दिवसांपासून या पाईपद्वारे खाटीक गल्लीतील लालपाणी, मैलमिश्रीत गटारीचे पाणी व प्राण्यांचे अवयव सीएसआरडी कॉलेज जवळील लिकेजमधून येत आहे.
महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही कुठलीही उपाययोजना व लिकेज दुरुस्तीचा प्रयत्नही केला नाही. मागील चार दिवसांपूर्वी आमच्या भागाला पाणीपुरवठा न करण्याच्या सूचना वॉलमनला दिल्यानंतर महापालिकेने लिकेज दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
या ठिकाणी महापालिकेचा पुन्हा एकदा अजब कारभार डोळ्यासमोर आला. 900 एमएम पिण्याच्या पाईपलाईनवरुन ड्रेनेजची पाईपलाईन
टाकण्याला सुरवात झाली. संपूर्ण भारतात असे काम कुठेही झाले नाही, परंतु नगरमध्ये ते होत आहे. ही ड्रेनेजची पाईपलाईन दुसऱ्या बाजूने शिफ्ट करण्याच्या सूचना दिल्या आहे. अन्यथा आंदोलन करीन, असा इशारा गणेश भोसले यांनी दिला आहे.
नागरिकांच्या जीवाशी खेळ
या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन साथीचे आजार उद्भवत आहेत. महापालिका ही नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. पाणीपुरवठा विभाग हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. परंतु पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते हे फक्त आयुक्त, महापौर व ठेकेदारांपुरतेच काम करत असतात.अशा अधिकाऱ्यांमुळे महापालिकेची बदनामी होत असते. त्यांची अधिकारी म्हणून नव्हे तर क्लर्क म्हणून नेमणूक करावी, असे आरोप नगरसेवक गणेश भोसले यांनी केले.
अधिकाऱ्यांना पाजणार मैलामिश्रीत पाणी
नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी आयुक्त शंकर गोरे यांना सारसनगर भागात होणाऱ्या मैलमिश्रीत पाण्याबाबतचे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या 8-10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मैलमिश्रित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मैलमिश्रीत पाण्याचा प्रश्न येत्या दोन दिवसांत मार्गी न लागल्यास महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांना मैलमिश्रित पाणी पाजले जाईल, असा इशारा प्रकाश भागानगरे यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरूस्तीसाठी खोदाई केली होती. त्यात जलवाहिनी फुटल्याने गळती लागली होती. आता ते काम पूर्ववत केले आहे.
रोहिदास सातपुते, पाणीपुरवठा विभागप्रमुख.