राशीनच्या पाहुण्यामुळे श्रीगोंद्यात कोरोनाची बाधा, नर्सही पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर म्हणाले, आजचे तीन कोरोना बाधित व्यक्तींमध्ये दोन पुरुष व एक महिला आहे. सदर महिला ही शहरातील एका महत्वाच्या रुग्णालयात नर्स आहे.

श्रीगोंदे : तालुका कोरोनापासून लांब असतानाच आता राशीनच्या त्या कोरोनाबाधित पाहुण्याने होत्याचे नव्हते केले. दोन दिवसांपूर्वी दोन जण कोरोना बाधित सापडले होते. आज पुन्हा तीनजण कोरोना बाधित आढळले. यात एका रुग्णालयातील नर्स असल्याने खळबळ उडाली आहे.

राशीनच्या त्या व्यक्तीमुळे दोन जण कोरोनाबाधित सापडले. तो पाहुणा गेल्या आठवड्यात श्रीगोंद्यात मुक्कामी होता. एका हॉस्पिटलमध्येही गेला होता. त्यामुळे आता त्यात अजून तीनची वाढ झाली. त्यामुळे तालुक्यात एकुण आठ जण कोरोना बाधित झाले अाहेत. त्यातील तिघांना घरी पाठवले आहे.

हेही वाचा - बाप रे आज तर एकदम अठरा पॉझिटिव्ह

तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर म्हणाले, आजचे तीन कोरोना बाधित व्यक्तींमध्ये दोन पुरुष व एक महिला आहे. सदर महिला ही शहरातील एका महत्वाच्या रुग्णालयात नर्स आहे. मात्र, संशय आल्याने तीन दिवसांपासून तिला क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दोन पुरुष साळवणदेवी परिसरातील तर महिला काळकाई चौकातील आहे. त्यामुळे कोरोनाचा शहरात विस्तार होत असल्याने शहर काही दिवसांसाठी पुर्ण बंद करण्याच्या हालचाली प्रशासन करीत आहे. या बाबत तहलीदार महेंद्र माळी म्हणाले, वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेत आहोत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient in Shrigonda due to rashin guest