esakal | जिवावर उदार होऊन लढताहेत कोरोना योद्धे
sakal

बोलून बातमी शोधा

जिवावर उदार होऊन लढताहेत कोरोना योद्धे

तिच्या सध्याच्या कामाबद्दल तिच्या तोंडून ऐकून थक्क व्हायला होते. कोणत्याही नोकरीचा पहिला उद्देश उदरनिर्वाह असला, तरी त्यापलीकडे जाऊन "व्रत' घेऊन सेवा करणाऱ्यांपैकी संगीताचं हे काम! 

जिवावर उदार होऊन लढताहेत कोरोना योद्धे

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कोरोना योद्धे जिवावर उदार होऊन रुग्णांच्या सेवेच्या माध्यमातून देशसेवा करीत आहेत. अशाच अनेक योद्‌ध्यांपैकी तालुक्‍यातील कळंब येथील सारिका सखाराम जाधव व तिचे पती सखाराम बबन जाधव हे दांपत्य, करंडी या अतिदुर्गम खेड्यातील संगीता गोंदके (केईएम रुग्णालय, मुंबई), शिक्षक असलेले रुंभोडी येथील केशव मालुंजकर पोलिसाच्या वर्दीमध्ये, रुंभोडीचाच सोमनाथ नारायण मालुंजकर हे वॉर्ड अटेंडंट दिवस-रात्र काम करीत आहेत. 

पती आर्मी हॉस्पिटलमध्ये, पत्नी मुंबईत परिचारिका 
सखाराम जाधव सैन्यामध्ये असून, सध्या त्यांची पोस्टिंग पंजाबला आहे. आर्मी मेडिकल कोरमध्ये चंडीगड येथे आर्मी हॉस्पिटलचे "लॅब टेक्‍निशियन' म्हणून ते कर्तव्य बजावत आहेत. त्यांची पत्नी सारिका मुंबईमध्ये हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करीत आहेत. 30 मार्चपासून घरकाम करणाऱ्या बाई कामावर येणे बंद झाले. सासू-सासरे गावी निघून आले. अशा परिस्थितीत दोन मुलांना घरात कोंडून सारिका जाधव कामावर जात. रात्रपाळी असेल, तेव्हा मुलांना शेजारी ठेवत. नंतर मुलांचे हाल होऊ लागल्याने दोन्ही मुलांना गावी आणून सोडले आणि त्या पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्या. त्या कार्यरत असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे 40 रुग्ण असून, 100च्या वर क्वारंटाईन रुग्ण आहेत. 

हेही वाचाः नगरमधील एकाच कुटुंबातील पाच जण बाधित

केईएम हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा 
जगभर पसरलेल्या कोरोनाच्या साथीमुळे सामान्य माणसे आपापल्या घरात सुरक्षित असताना प्राण हातावर घेऊन अनेक कोरोना योद्धे लढाई लढत आहेत. अनेक सामान्य योद्धे महामारीच्या या रणांगणावर असामान्य कर्तृत्व गाजवत आहेत. अकोले तालुक्‍यातील करंडी या अतिशय दुर्गम खेड्यातील संगीता गोंदके ही वीरकन्या सध्या मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे कर्तव्य बजावत आहे. खरे तर सध्याच्या तिच्या व्यस्त दिनक्रमात तिच्याशी संपर्कदेखील अत्यंत मुश्‍किलीने झाला. तिच्या सध्याच्या कामाबद्दल तिच्या तोंडून ऐकून थक्क व्हायला होते. कोणत्याही नोकरीचा पहिला उद्देश उदरनिर्वाह असला, तरी त्यापलीकडे जाऊन "व्रत' घेऊन सेवा करणाऱ्यांपैकी संगीताचं हे काम! 

रुग्णाला मानसिक आधारही द्यावा लागतो 
"सध्या हॉस्पिटलमध्ये दिवसभर कोरोनाचे अनेक रुग्ण येतात. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यापासून या रुग्णांची भेदरलेली मानसिकता आणि अगतिकता पाहून आमचे हृदय पिळवटून जाते. कोरोना रुग्णाच्या बाबतीत प्रत्यक्ष आजारापेक्षा रुग्णाच्या मनातील आजाराची दहशतच जास्त असते. त्यामुळे त्यांची शुश्रूषा करताना त्यांना मानसिक आधारही द्यावा लागतो. गोरगरीब, झोपडपट्टीत राहणारे, हातावर पोट असणारे मजूर असे अनेक कोरोनाबाधित रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतात. त्यांच्यातील आजाराविषयी गांभीर्याचा अभाव आणि अज्ञान या बाबी त्यांच्यावर उपचार करताना आव्हानात्मक असतात,' असे संगीता म्हणते. 

हेही वाचा ः हा तालुका दर वर्षीच पाळणार लॉकडाऊन

पोलिसाच्या वर्दीमध्ये शिक्षक! 
केशव मालुंजकर पेशाने शिक्षक असून, पोलिसाच्या वर्दीमध्ये कोरोना योद्धा म्हणून सेवा देत आहे. सध्या कल्याणमध्ये सेवेत असून, "आरएसपी'च्या माध्यमातून भूमिका बजावत आहे. ते पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून दिवसभर उन्हातान्हात काम करत आहेत. सोमनाथ मालुंजकर हे वॉर्ड अटेंडंट म्हणून लढा देत असून, त्यांच्या चेहऱ्यावर देशासाठी व रुग्णांसाठी करीत असलेल्या सेवेचे मोठे समाधान दिसत आहे. घाटकोपर (मुंबई) येथील मुंबई महापालिकेच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दररोज कोरोना पॉझिटिव्ह पेशंटची सेवा करीत आहेत. 

जबाबदारी मोठी असतेच 
वॉर्ड अटेंडंट म्हणून जबाबदारी मोठी असतेच. दररोज 90 ते 95 कोरोना पॉझिटिव्ह पेशंट असतात. त्यापैकी जवळपास 85 ते 90 टक्के पेशंट बरे होऊन जातात; परंतु जितके डिस्चार्ज होतात, त्याच्या दुप्पट पेशंट रमाबाई आंबेडकरनगर, विक्रोळी, घाटकोपर, भटवाडी, कामराजनगर येथील झोपडपट्टीतील पेशंट तपासणीला येत असतात. ओपीडीला जवळपास दररोज 200 ते 250 पेशंट येतात. कुटुंबाला गावी नेऊन सोडण्याचे आदेश दिल्याने ते टेन्शन येत नाही. हॉस्पिटलमध्ये सर्व पीपीई किट आल्याने सुरक्षित वाटते, असे ते सांगतात.