शिर्डी : कोविड रुग्णसंख्येची शंभरी पार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona
शिर्डी : कोविड रुग्णसंख्येची शंभरी पार

शिर्डी : कोविड रुग्णसंख्येची शंभरी पार

शिर्डी : राहाता तालुक्यात आज (रविवार) एकूण सक्रिय कोविड (Covid)रुग्णसंख्येने शंभरी पार केली. शिर्डीत आज एकाच दिवसात २६ रुग्ण आढळले. संसर्ग फैलावण्याचा वेग अधिक आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. रॅपिड चाचण्यांत (Rapid Test)सहज निदान होत आहे, असे निरीक्षण प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील डाॅ. राहुल कुंकूलोळ यांनी नोंदविले. चाचण्यांवर भर व लसीकरणास (Vaccination)वेग देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

हेही वाचा: खाकी वर्दीवर रक्ताचा डाग; मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी बॉयला उडवलं

डाॅ. कुंकूलोळ म्हणाले, प्रवरा ग्रामीण रुग्णालयात सध्या तीसहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील बहुतेकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. त्यामुळे लक्षणे सौम्य आहेत. यापूर्वीच्या लाटेच्या तुलनेत यावेळी संसर्ग फैलावाचा वेग अधिक असला, तरी रुग्णांत लक्षणे सौम्य आहेत. सर्दी-खोकला कमी, एक-दोन दिवस ठराविक वेळी ताप येतो. उपचारास चांगला प्रतिसाद मिळतो आणि रुग्ण तीन ते चार दिवसांत बरा होतो. एका सहासष्ट वर्षीय रुग्णाने उपचारास दाखल होण्यास उशिर केल्याने त्याला आॅक्सिजन द्यावा लागला. त्याची प्रकृती सुधारली आहे. बारा ते चौदा वर्षे वयोगटात देखील रुग्ण आढळत आहेत. सध्यातरी संसर्ग फुफ्फुसापर्यंत जात नाही, ही दिलासादायक बाब आहे.(Ahmednagar News)

हेही वाचा: ‘... तरच मुस्लिमाचे घर सुरक्षित राहील’

तहसीलदार हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राहात्यात तेरा, शिर्डीत पंचेचाळीस तर लोणी बुद्रुक येथे सत्तावीस, अशी एकूण सक्रिय रुग्णसंख्या आहे. बाभळेश्वर बु., जळगाव, पिंपळस,राजूरी, पिंप्रीनिर्मळ, वाकडी, दाढ बु. अडगाव बु., कोल्हार बु. चितळी व पुणतांबे या गावांत एक अंकी रुग्णसंख्या आहे. उर्वरित पंचेचाळीस गावांत एकही रुग्ण नाही. एलमवाडी, तरकसवाडी, चोळकेवाडी, धनगरवाडी, नांदूर खु., एकरुखे, हसनापूर, डोऱ्हाळे, नांदूर्खी खुर्द, सावळीविहीर बु. व खुर्द, राजूरी, केलवड खु. व कोल्हार बु. या चौदा गावांत शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन साईसंस्थानने तातडीने कोविड रुग्णालय सुरू करणे गरजेचे आहे. तशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. कोविड लसीकरण व चाचण्यांना वेग देण्याचे नियोजन केले आहे. रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

- कुंदन हिरे, तहसीलदार, राहाता

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top