
अहमदनगर : ट्रॅक्टर खरेदीच्या व्यवहारात चार लाख रूपयांची फसवणूक करणारा आरोपी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केला. रामचंद्र ज्ञानदेव भागिरे (रा. सोलनकरवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आला. प्रसाद चिंतामण हिंगे (रा. खोडद गडाचीवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली होती.
हिंगे यांनी अहमदनगर येथील नाथ मोटर्समार्फत जुन्या वाहन खरेदी-विक्रीकरीता ट्रॅक्टर विक्रीस लावलेला होता. त्याचा व्यवहार ठरल्याने ता. १३ जानेवारी २०२२ रोजी मार्केटयार्ड येथे रामचंद्र भागिरे यांना ५ लाख ८० हजार रूपये किंमतीला सौदा केला. भागिरे यांनी एक लाख ८० हजार रूपये देऊन ट्रॅक्टर ताब्यात घेतला. उर्वरीत रक्कम चार लाख रूपये दोन दिवसात देण्याचे ठरले. मात्र, उर्वरीत पैसे न देता ट्रॅक्टर घेऊन गेले व फसवणूक केल्याची फिर्याद हिंगे यांनी केली होती.
पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन शोध घेत ट्रॅक्टर ताब्यात घेतला. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपत शिंदे, उपनिरीक्षक मनोज कचरे, अंमलदार डी. बी. ढगे, बंडू भागवत, सुमित गवळी, रवींद्र टकले, संतोष गोमसाळे, सागर पालवे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे यांनी ही कारवाई केली.