
गाडे म्हणाले, की नगर तालुक्यात लोकशाही पद्धतीने बॅंकेचे ठराव झाले, तर कर्डिले यांना 15 मतेही पडणार नाही. गावात एक ठराव होतो, इकडे दुसऱ्यालाच उभे केले जाते.
नगर तालुका ः शिवसेना शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढत आहे. दुसरीकडे भाजपचे काही जण जिल्हा बॅंकेचे खेळते भांडवल कर्ज स्वरुपात देऊन शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख (दक्षिण) प्रा. शशिकांत गाडे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता केला.
जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे व पंचायत समिती सदस्य सुरेखा गुंड यांच्या प्रयत्नातून पारेवाडी (ता. नगर) येथे सव्वा कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यात गाडे बोलत होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती काशीनाथ दाते, घनश्याम शेलार, संदेश कार्ले, शरद झोडगे, गोविंद मोकाटे, प्रवीण कोकाटे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत आदी उपस्थित होते.
गाडे म्हणाले, की नगर तालुक्यात लोकशाही पद्धतीने बॅंकेचे ठराव झाले, तर कर्डिले यांना 15 मतेही पडणार नाही. गावात एक ठराव होतो, इकडे दुसऱ्यालाच उभे केले जाते. श्रीगोंदे मतदारसंघात आमची चूक झाल्यामुळे शेलार यांचा पराभव झाला. पुढील वेळी शेलार यांना आमदार करणार. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून 160 कोटींचे खेळते भांडवल वाटप केले.
हे सर्व भांडवल कर्ज स्वरूपात दिले. त्यामुळे एकही सोसायटी ऊर्जितावस्थेत येणार नाही. शेलार म्हणाले, की खेळते भांडवल चार टक्क्यांनी वाटले, तरी मार्चमध्ये भरायचे म्हटल्यावर ते 12 टक्के व्याजाने पडणार आहे. बॅंक व शेतकरी मातीत घालण्याचा धंदा सुरू आहे. दरम्यान, महिला बचतगटांना बिनव्याजी कर्जवाटप करण्यात आले.