esakal | पाथर्डी तालुक्यात पोलीसांच्या नाकावर टिच्चून लग्नात गर्दी; सर्वपक्षीय गावपुढारी ते लोकप्रतिनिधी उपस्थित
sakal

बोलून बातमी शोधा

wedding ceremony

पाथर्डी तालुक्यात विवाह सोहळ्यांना गर्दी; पोलिसांचे दुर्लक्ष

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (जि.अहमदनगर) : कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करीत शहरासह तालुक्यात विवाह सोहळ्यांना हजारोंची गर्दी जमा होते. पन्नास लोकांना विवाहासाठी परवानगी असताना, परवानगी न घेता शेकडो लोक उपस्थित राहून सोहळे पार पाडतात. विशेष म्हणजे सर्वपक्षीय गावपुढाऱ्यांपासून विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारीदेखील उपस्थिती लावतात. (crowd-at-wedding-ceremonies-In-Pathardi-taluka)

सर्वपक्षीय गावपुढाऱ्यांपासून विविध लोकप्रतिनिधी अन् अधिकारीदेखील उपस्थित

सोशल मीडियातून याचे जाहीर प्रदर्शनही नेत्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. महसूल व पोलिस प्रशासन गप्प असून, तक्रार नसल्याने कारवाई कशी करायची, असा प्रश्न आहे. शहरातील विविध धार्मिक स्थळे व मंगल कार्यालयांत आणि ग्रामिण भागातील गावागावांत सध्या विवाह सोहळे जोरात सुरू आहेत. कोरोनाच्या नियमांचे कोणतेही पालन येथे होत नाही. काही ठिकाणी तर परवानगी घेतली जात नाही. तरीही शेकडो लोक उपस्थित राहतात.

सरपंच, पंचायत समिती सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व सर्वच लोकप्रतिनिधी सोहळ्यांत सहभागी होत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव जोमाने होण्याची शक्यता आहे. महसूल व पोलिस प्रशासन मात्र, तक्रार नाही तर कारवाई नाही, अशी भूमिका घेत आहेत.

हेही वाचा: घुलेवाडीच्या सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पथक नेमून चौकशी करावी. विवाह सोहळ्यांना जमणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणावे. जे अधिकारी याबाबत कारवाई करण्यास टाळाटाळ करतात, त्यांची चौकशी करावी. - किसन आव्हाड, तालुका संघटक, आम आदमी पक्ष, पाथर्डी

विवाह सोहळ्यांत पन्नास लोकांना परवानगी आहे. मंगल कार्यालये व ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यांवर नजर ठेवू. कोणाचीही तक्रार नाही. याबाबत कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. नियम मोडणाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. - देवदत्त केकाण, प्रांताधिकारी, पाथर्डी- शेवगाव

हेही वाचा: शैक्षणिक संस्थांचा प्रवेशासाठी 'हायटेक' प्रचार!

loading image