काय म्हणाव यांना.. सवलत दिली की उसळली शॉपिंगसाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

वीजपंप, वाहने दुरुस्तीची दुकानेही उघडण्यात आली. ग्राहक व दुकानदार दोन्हींमध्येही कोरोनाविषयीची भीती मात्र दिसून आली. त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडावर मास्क होताच. ग्राहकांनी प्रामुख्याने शेतीविषयक वस्तू, ग्रीन शेडचे कापड, किराणा, कपडे, मिठाई आदींची खरेदी केली.

नगर ः लॉकडाउनमध्ये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आजपासून मुख्य बाजारपेठा व कन्टेन्मेंट झोन वगळून नागरिक व दुकानदारांना थोडी सूट दिली. त्यामुळे आज शहरात कन्टेन्मेंट व बफर झोन वगळता सर्व ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली.

रस्त्यावर नागरिक दिसत असले, तरी खरेदी करताना ग्राहक सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन करताना दिसून आले. 
लॉकडाउनचे नियम व अटी शिथिल होताच आज सर्व वस्तूंची दुकाने उघडण्यात आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले. अनेक जण वाहने घेऊन रस्त्यांवर आले.

हेही वाचा - चंद्रकांत पाटील यांचे अंगण नेमके कोणते

आवश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. केशकर्तनालयेही आज उघडल्याने दुपारनंतर तेथे ग्राहकांची संख्या वाढू लागली. नाभिकांनी दुकानांत सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची दक्षता घेतली होती. दुकानाबाहेरच पाण्याची बादली व हॅन्डवॉश ठेवले होते. शिवाय सॅनिटायझरही हातावर देण्यात येत होते.

वीजपंप, वाहने दुरुस्तीची दुकानेही उघडण्यात आली. ग्राहक व दुकानदार दोन्हींमध्येही कोरोनाविषयीची भीती मात्र दिसून आली. त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडावर मास्क होताच. ग्राहकांनी प्रामुख्याने शेतीविषयक वस्तू, ग्रीन शेडचे कापड, किराणा, कपडे, मिठाई आदींची खरेदी केली. घरातील बंद पडलेली उपकरणे दुरुस्तीला टाकतानाही अनेक जण दिसून आले. खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, कपड्याची मोठी दुकाने, मुख्य बाजारपेठेतील दुकाने मात्र उघडली नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds in shops for Ahmednagar shopping