esakal | नेवासेत बहरली झेंडूफुलांची शेती! दसरा, दिवाळीला वाढणार फुलांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Cultivation of marigold in Kukane and Tarwadi in Nevasa taluka

कुकाणे, तरवडी, देवगाव परिसरात जूनमध्ये लागवड केलेल्या झेंडू फुलांची शेती सध्या बहरात आली आहे. यातच आता दसरा व दीपावली जवळ आल्याने फुलांना मागणी वाढणार असल्याने फूल उत्पादकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

नेवासेत बहरली झेंडूफुलांची शेती! दसरा, दिवाळीला वाढणार फुलांची मागणी

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : तालुक्यातील कुकाणे, तरवडी, देवगाव परिसरात जूनमध्ये लागवड केलेल्या झेंडू फुलांची शेती सध्या बहरात आली आहे. यातच आता दसरा व दीपावली जवळ आल्याने फुलांना मागणी वाढणार असल्याने फूल उत्पादकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

यंदा तालुक्यातील परिसरात दरवर्षींच्या तुलनेत कमी प्रमाणात फूलशेती आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून सुरू असलेला सततचा पाऊस व वातावरणात सतत बदल होत आहे. त्यामुळे झेंडू पिकावर बुरशी पडून झेंडूची झाडे मोठ्या प्रमाणात खराब होऊन वाळून चालली आहेत. याचा परिणाम बाजारात येणाऱ्या फुलांवर होत आहे. सध्या २० ते २५ रूपये किलोप्रमाणे विक्री होत असलेली झेंडूची फुले येत्या दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांमध्ये भाव खाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नेवासे तालुक्यातील फूल उत्पादक स्थानिक बाजारात किरकोळने तर नगर, श्रीरामपूर, औरंगाबाद, पुणे आदी शहरातील बाजारामध्ये ठोकभवात फुलांची विक्री करतात. यातून लाखो रुपयांचे उत्पादन मिळते. त्यामुळे दरवर्षी नेवासे, चांदे, शनि शिंगणापूर, कुकाणे, तरवडी, देवगाव, देडगाव, सलाबतपूर, गेवराई, रांजणगाव देवीसह सोनई परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आंतर पीक लागवडीत फूलशेती करतात. दसरा व दीपावली नंतर ही फूलशेती मोडून टाकली जाते.

यंदा झेंडू क्षेत्र कमीच 
गेल्यावर्षी नेवासे तालुक्यात सुमारे अडीचशे- तीनशे एकर झेंडूची लागवड होती. मात्र झेंडू लागवडीचा काळ व कोरोनामुळे लॉकडाऊन एकाच वेळात आल्याने वाहतूक, बाजारपेठ बंद, चांगल्या प्रतीचे रोपांच तुटवडा, लॉकडाऊनबाबतची अनिश्चिता यामुळे शेतकऱ्यांनी झेंडू लागवडीकडे पाठ फिरवल्याने यावर्षी शंभर ते दीडशे एकर क्षेत्रच झेंडू लागवड आहे.

फुल विक्रेते लक्ष्मण भुजबळ म्हणाले, झेंडूसह आदी फुलांची आवक कमी असलेतरी मागणी मोठ्या प्रमाणात आहे. दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूफुलांना सर्वाधिक मागणी असते.

लॉकडाऊनमुळे मी यावर्षी पाचऐवजी दोनच एकर झेंडू लागवड केली. मात्र परतीच्या वादळीवाऱ्यासह पावसाने झेंडूचे मोठे नुकसान झाले. दसरा-दिवाळी सणादरम्यान बाजारपेठेत फुलांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. आता फक्त निसर्गानची साथ हवी.
- भाऊसाहेब दरवडे, झेंडूफुल उत्पादक शेतकरी, तरवडी, ता. नेवासे
 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image