दरवर्षी दुष्काळाने, यंदा अतिवृष्टीने कपाशीचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल

सूर्यकांत नेटके
Monday, 16 November 2020

10 वर्षे दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा जिल्ह्यातील कापूस पट्ट्यात चांगला पाऊस झाला. मात्र, गरजेपेक्षा तो अधिक झाला. दरवर्षी पाण्याअभावी होणारे नुकसान यंदा जास्त पाण्याने झाले.

अहमदनगर : 10 वर्षे दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा जिल्ह्यातील कापूस पट्ट्यात चांगला पाऊस झाला. मात्र, गरजेपेक्षा तो अधिक झाला. दरवर्षी पाण्याअभावी होणारे नुकसान यंदा जास्त पाण्याने झाले.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सुमारे 67 हजार हेक्‍टरवरील कापसाचे 50 ते 70 टक्के नुकसान झाले आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार, यंदा सुमारे सहा ते सात लाख क्विंटल कापसाचे नुकसान झाले. साधारण सुमारे साडेतीनशे ते चारशे कोटींचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्याच्या उत्तर भागात उसाचे क्षेत्र अधिक असते. दक्षिणेतील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत भागात खरिपात कापसावर शेतकऱ्यांचा भर असतो. अलिकडच्या काळात उत्तरेतील राहाता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे भागातील शेतकरीही कापसाकडे वळले आहेत. गेल्या 10 वर्षांत अनेक वेळा कापसाच्या पट्ट्यात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. यंदा सुरवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने कापसाचे क्षेत्र वाढले. यंदा सव्वालाख हेक्‍टरवर कापूसलागवड झाली. मात्र, ऐन कापूसवेचणीच्या काळातच दोन महिने जोरदार पाऊस झाला. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अनेक भागात सलग 25-30 दिवस पाऊस झाला. त्यामुळे साचलेल्या पाण्याने कपाशी सडली. वेचणीला आलेला कापूस भिजून काळा पडला. शिवाय न फुटलेली कापसाची बोंडेही जागीच सडली. त्याचा मोठा फटका यंदा बसणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, यंदा पावसाने 67 हजार हेक्‍टरवरील कापसाचे 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

जाणकाराच्या माहितीनुसार, कापसाचे एकरी 8 ते 10 क्विटंल उत्पादन होते. यंदा साधारण 40-50 टक्के कमी उत्पादन हाती येणार आहे. त्यामुळे सरकारी बाजारानुसार कापुसउत्पादकांना साडेतीनशे ते चारशे कोटींचा फटका बसणार आहे. दरवर्षी दुष्काळामुळे कापसाचे नुकसान होते. यंदा जादा पावसाचा तडाखा बसला. प्रशासनाने 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसानीचे पंचनामे केले. मात्र, 33 टक्‍क्‍यांच्या आतील सुमारे 20-25 हजार हेक्‍टरला फटका बसल्याचे सांगितले जाते. 

दरवर्षी दुष्काळाने, तर यंदा अतिपावसाने कापसाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे कापूस उत्पादकांमागील संकटाची मालिका यंदाही कायम आहे. झालेले नुकसान पाहता कापूस उत्पादकांना किमान हेक्‍टरी 50 हजारांची मदत मिळणे गरजेचे आहे. 
- भारत अभंग, शेतकरी, हातगाव, ता. शेवगाव  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to cotton due to heavy rains in Nagar district