esakal | राहुरीत पावसाचा हाहाकार! अनेक गावांचा संपर्क तुटला | Rain Update
sakal

बोलून बातमी शोधा

damage to agriculture due to havy rains in rahuri taluka

राहुरीत पावसाचा हाहाकार! अनेक गावांचा संपर्क तुटला

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (जि. अहमदनगर) : तालुक्यात काल (सोमवारी) रात्री जोरदार पाऊस कोसळला. ओढ्या-नाल्यांना पूर आला. बंधारे फुटले. शेतांत पाणी शिरल्याने उभी पिके पाण्याखाली गेली. आज (मंगळवारी) सकाळी आठ वाजता मुळा धरणातून विसर्ग वाढवून आठ हजार ६८० क्यूसेकने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडले. मुळा नदी दुथडी भरुन वाहू लागल्याने जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


बारागाव नांदूर येथे हावरीच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे बराच वेळ राहुरीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. घोरपडवाडी, मल्हारवाडी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. घोरपडवाडी येथे वाघाची नळी बंधारा फुटला. आसपासच्या शेतांत पाणी साचले. कांदा, सोयाबीन, कपाशी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ यांनी बारागाव नांदूर परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

हेही वाचा: दोघांना वाचवले, पण पोटच्या मुलाला वाचवताना पित्याचाही अंत


केंदळ येथे पुलावरून पाणी वाहू लागल्याने बराच वेळ राहुरीचा संपर्क तुटला. केंदळ, मानोरी, मांजरी, आरडगाव, तांदूळवाडी, पाथरे भागात ओढ्या-नाल्यांच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, एकरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे. राहुरी तालुक्यात पाच ऑक्टोबर अखेर सरासरी ४४४.५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी आज अखेर ६१२.२ मिलिमीटर (सरासरीच्या १३७.८ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा: सख्ख्या भावंडांवर नियतीचा घाला; आई आणि बहिणीचा एकच आक्रोश

महसूल मंडळ निहाय कालचा पाऊस (मिलिमीटर) असा :
राहुरी (६.५), सात्रळ (३३.३), ताहाराबाद (५३), देवळाली प्रवरा (४२.८), टाकळीमियाँ (२७.५), ब्राह्मणी (१७.३), वांबोरी (३१.३).

काल रात्रीच्या पावसाने कपाशीच्या पिकात गुडघाभर पाणी साचले. ट्रॅक्टर कर्जाचा ५२ हजारांचा हप्ता भरायचा आहे. काढणीला आलेली कपाशी हातातून गेली आहे. निसर्ग कोपलाय. सुलतानी-आस्मानी संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. - विशाल तारडे, नुकसानग्रस्त शेतकरी, केंदळ.

loading image
go to top