दक्षिण काशीत दशक्रिया, तेराव्याचा विधी अॉनलाईन, कावळाही येतो एका क्लिकवर

Dasakriya in South Kashi, Thirteenth Ritual Online
Dasakriya in South Kashi, Thirteenth Ritual Online

शिर्डी ः कोविडच्या साथीत जे दगावले ब-याचदा त्यांच्या अस्थीदेखील आणता येत नाहीत. अशावेळी दशक्रिया आणि पुढील विधी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय पुढे येत आहेत. यजमानांची इच्छा असेल तर पळसांच्या काड्यांचा पुतळा करून त्यावर दहन संस्कार करायचे. त्यानंतर पुढील विधी सुरू करायचे.

हा पूर्वापार चालत आलेला पालाश विधी सध्या केला जातो. तर काही पुरोहित मंडळी अॉनलाईन पूजा विधी सांगत हे विधी त्या त्या गावात करवून घेत आहेत. लाॅकडाऊनमुळे जवळपास बंद पडलेले दशक्रिया विधी आता फिजीकल डिस्टन्स पाळून मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत पुन्हा सुरू झाले आहेत. 

गोदावरीतिरी वसलेले पुणतांबा हे तीर्थक्षेत्र दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते. येथे अस्थीविसर्जन व दशक्रिया विधी करण्यासाठी दुरवरून लोक येतात. दहा ते पंधरा पुरोहित मंडळी येथील घाटावर हे क्रियाकर्म करतात. लाॅकडाऊनच्या काळात हे विधी जवळपास बंद झाले होते. ब-याच लोकांनी ते पुढे ढकलले. लाॅकडाऊन उठल्यानंतर ते पून्हा सुरू झाले. 
या बाबत सकाळशी बोलताना हे क्रियाकर्म करणारे पुरोहित राहुल जोशी म्हणाले, आम्ही पिढीजात हे क्रियाकर्म करतो. लोक आमच्या घरी मुक्कामास थांबतात. कोरोनाच्या साथीमुळे संसर्गाचा धोका वाढला. त्यामुळे कुणी मुक्कामास थांबवित नाही. मास्क व सैनिटायझरचा वापर करून पूजा विधी सांगतो. खूप काळजी घेतो तरीही काळजी वाटते. मध्यंतरी यजमानांच्या आग्रहामुळे काही पालाश विधी केले.

अस्थीच मिळत नसल्याने पलाश विधी

या बाबत माहिती देताना राहाता येथील अनंतशास्त्री लावर म्हणाले, पूर्वी युध्दात राजे, सेनापती, सरदार व शेकडो सैनिक मृत्युमूखी पडायचे. पार्थिव मिळत नसल्याने त्यांचे अंत्यविधी करणे शक्य नसायचे. अशा वेळी प्रतिकात्मक विधी करायचा. त्यासाठी पळसाच्या तीनशे साठ काड्या वापरून कणकेचा पुतळा करायचा. त्याचे दहन करून पुढील विधी केले जायचे. त्याला पालाश विधी म्हणतात.

कोविडच्या साथीत हे विधी ठिकठिकाणी केले जात आहेत. धर्मसिंधू हा ग्रंथ भारतभर प्रमाण मानला जातो. त्यात या विधीचा उल्लेख आहे. तर गणेश पुजा, अभिषेक पुजा , गृहशांती आदी पूजा आम्ही आॅनलाईन करतो. भाविकांनी हा पर्याय काही प्रमाणात स्वीकारला आहे.

प्रा.राजेंद्र निकाळे म्हणाले, बौध्द समाजात अंत्यसंस्कारात जलदान विधीला फार महत्व असते. कोविडच्या साथीत कुणी दगावले आणि घरातील लोकांचा कोरंटाईन काळ संपला. पंधराव्या दिवशी जलदान विधी केला जातो. गौतम बुध्दांच्या प्रतिमेची पूजा, पंचशिल त्रिशरण वंदना करून उपस्थितांना गोड जेवण दिले जाते. शहरात नुकताच असा विधी करावा लागला.

मुस्लिमांमध्ये असे असते

येथील फळ व्यापारी मुन्नाभाई शाह म्हणाले, कोविडच्या साथीत मुस्लिम बांधवात कुणी दगावले तर त्याच्या घरी कुराण पठण केले जाते. पूर्वी दहावा व चाळीसावा दिवस केला जायचा. आता पाच टक्के घरातही तो विधी होत नाही. 

ख्रिश्चन मिस्सा करतात

येथील चर्चचे फादर पाॅली डिसील्व्हा म्हणाले, कोविडच्या साथीत कुणी दगावला तर चर्चमध्ये आम्ही पवित्र मिस्सा करतो. अद्याप तशी घटना शहर व परिसरात घडलेली नाही. 

पिंडाला कावळा लवकर शिवतो

दशक्रिया विधीसाठी पूर्वी लोक मोठ्या संख्यने जमत आता ही संख्या घरातील दहा ते पंधरा लोकांपर्यत मर्यादित झाली. त्यातही फिजीकल डिस्टन्स पाळावे लागते. उपस्थितांच्या हालचालीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे पिंडाला कावळा लवकर शिवतो. जणूकाही कावळा एका क्लिकवर म्हणजे एका आवाहनानंतर लगेच शिवतो, असा अनुभव पुरोहित राहूल जोशी यांनी सांगितला.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com