पुण्यातून आलेल्या महिलेचा मृत्यू...क्वारंटाइन केलेले चौघे गेट तोडून पळाल्याने राहुरीकर टेन्शमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

केंदळ खुर्द येथे सरडेवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथून आलेले पती-पत्नी व दोन मुले यांना शाळेत 'इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन' ठेवलेले होते. त्यांनी शुक्रवारी (ता. १५) रात्री दहा वाजता शाळेतून बाहेर पडण्यासाठी मोठा आकांडतांडव केला.

राहुरी : वांजुळपोई येथे पुण्यावरून आलेल्या एका महिलेचे रविवारी (ता. १७) निधन झाले. त्यांच्या घशातील स्त्राव‌ कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविले आहेत. केंदळ खुर्द येथे शाळेत 'इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन' ठेवलेल्या चार जणांनी पलायन केले. त्यामुळे, अद्याप कोरोना बाधित नसलेल्या 'राहुरी' चे टेन्शन वाढले आहे. 

वांजुळपोई येथे १८ मार्च रोजी पुण्यावरून आलेल्या सत्तावीस वर्षे वयाच्या महिलेचे अचानक निधन झाले. त्यामुळे, तालुका प्रशासन खडबडून जागे झाले. मृत्यूनंतर या महिलेचा घशातील स्त्राव कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्यांच्या घरातील सात व्यक्तींना होम क्वारंटाईन केले आहे.  नेवासा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह ठेवण्यात आला आहे. कोरोना तपासणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. उद्या (बुधवारी) अहवाल येणे अपेक्षित आहे. तोपर्यंत मृतदेह अंत्यसंस्कार केले जाणार नाही. 

हेही वाचा - गाव सोडून मुंबईत गेलेले कोट्यधीश कुटुंब परतले, पण गावाकडे ना घर ना शेती

केंदळ खुर्द येथे सरडेवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथून आलेले पती-पत्नी व दोन मुले यांना शाळेत 'इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन' ठेवलेले होते. त्यांनी शुक्रवारी (ता. १५) रात्री दहा वाजता शाळेतून बाहेर पडण्यासाठी मोठा आकांडतांडव केला. शनिवारी (ता. १६) पहाटे या चार जणांनी शाळेच्या गेटचे कुलूप तोडून पलायन केले. केंदळ खूर्द कोरोना ग्रामसुरक्षा समितीने तसा अहवाल पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना दिला आहे.
राहुरी तालुक्यात आज अखेर एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. परंतु, वांजुळपोई व केंदळ खुर्द येथील घटनेमुळे तालुका प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे.

"वांजुळपोई येथील मृत महिला पहिल्या लॉकडाऊनच्या दोन दिवस अगोदर पुण्यावरून आल्या होत्या. त्यांना चौदा दिवस 'होम क्वारंटाईन' केले होते. त्यांना कोरोना व सारी आजाराची लक्षणे नव्हती. तरी, दक्षता म्हणून घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविला आहे. केंदळ खुर्द येथील 'इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन' चार जण शाळेतून पळाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.

- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a woman from Pune