५४ लाखाच्या गुटखा कारवाईत पोलिसांची चौकशी करण्याची मागणी

गौरव साळुंके
Wednesday, 14 October 2020

एकलहरे शिवारात पकडलेल्या लाखों रुपयांच्या गुटखा प्रकरणातील संशयित मुख्य आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट यांची चौकशी करुन नार्को तपासणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांनी केली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील एकलहरे शिवारात पकडलेल्या लाखों रुपयांच्या गुटखा प्रकरणातील संशयित मुख्य आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट यांची चौकशी करुन नार्को तपासणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांनी केली आहे. यासंदर्भात मकासरे यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना चौकशीच्या मागणीचे निवेदन दिले. 

शहर पोलिस ठाणे हद्दीत असलेले एकलहरे शिवारात पोलिसांनी छापा टाकुन 54 लाखांचा गुटखा आणि सुंगधी तंबाखू जप्त केली. शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली. तर दोन संशयीत आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. परंतु गुटख्याची अवैद्य विक्री आणि साठेबाजी करणारे मुख्य आरोपींना पोलिसांनी अद्याप अटक केली नसल्येने पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट यांनी केलेली कारवाई शंकास्पद असल्याचा सवाल मकासरे यांनी उपस्थित केला आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गुटखा प्रकरणातील बेलापुर येथील मुख्य सुत्रधारांवर अद्याप कारवाई झालेली नाही. शहर पोलीस ठाणे अंतर्गत झालेल्या अनेक कारवाई नेहमीच वादग्रस्त ठरल्यामुळे सामान्य नागरीकांना पोलिसांवरील विश्वास उडालेला आहे. संबधीत पोलिस निरिक्षकांची अनेकदा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्या असुन पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे त्यांची चौकशी सुरु असल्याचे मकासरे यांनी निवेदनात नमुद केले आहे. त्यामुळे संबधीत पोलिस निरिक्षकांची चौकशी आणि नार्को तपासणी करुन त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी मकासरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मकासरे यांनी पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनाची प्रत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह नाशिक लाचलुचपत विभागाला पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for police inquiry into gutka operation worth Rs 54 lakh