
आदिवासी पट्ट्यामधील गावांमध्ये सुरू असलेल्या गावरान बीच बियाणे संवर्धन व रुंदी प्रकल्पास राज्याचे कृषी उपायुक्त विनयकुमार आवटे यांनी तज्ञ टीमसह नुकतीच भेट दिली.
अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामधील गावांमध्ये सुरू असलेल्या गावरान बीच बियाणे संवर्धन व रुंदी प्रकल्पास राज्याचे कृषी उपायुक्त विनयकुमार आवटे यांनी तज्ञ टीमसह नुकतीच भेट दिली.
याप्रसंगी कृषी उपआयुक्त बाबतीवाले, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानचे विठ्ठल सोनवणे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, त्र्यंबकेश्वरचे तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, कृषी परिवेक्षक पोखरकर एस. के. दीपा मोरे, पारंपरिक बियाणे संवर्धक व समन्वयक सह्याद्री स्कूल, बायफचे राज्य समन्वयक सुधीर वागळे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल कौठाळे, विषय तज्ञ संजय पाटील, बायफ नासिक विभागीय अधिकारी जितिन साठे, पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या गावरान बियाणे बँकेस भेट दिली.
याठिकाणी बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेच्या मार्गदर्शनाने स्थापन केलेल्या कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्था सदस्यांसोबत त्यांनी चर्चा करून माहिती घेतली. शबरी महामंडळ नाशिक यांच्या अर्थसाहाय्याने सुरू असलेल्या गावरान बियाणे संवर्धन व मूल्यवर्धन प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. कोंभाळणे येथे विविध पिकांच्या वाणांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्याला भेट देताना बायफचे तज्ञ मार्गदर्शक संजय पाटील व बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्याकडून गावरान बियाण्यांची सखोल माहिती त्यांनी करून घेतली. त्यानंतर एकदरे येथील भाताच्या बीज बँकेला त्यांनी भेट दिली.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या ठिकाणी हैबतराव भांगरे व हिराबाई हैबत भांगरे यांच्याकडून गावरान बीज संवर्धनाबद्दल माहिती करून घेतली. दुपारनंतर देवगाव येथील फुड मदर ममताबाई देवराम भांगरे यांच्या शेताला भेट देऊन रब्बी हंगामात पेरणी केलेल्या विविध गावरान वाणांची पाहणी केली. तसेच हंगामी व बहुवर्षायू परस बागेची पाहणी करून त्यातील बारकावे जाणून घेतले.
ममताबाई भांगरे यांनी स्वतः तयार केलेल्या नागलीच्या भाकरी आणि वालाच्या शेंगांची आमटी यांचा स्वयंपाक पाहुण्यांनी दुपारच्या भोजनात घेतला. शेवटी वाकी येथे अकोले तालुका महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे विविध उपक्रम त्यांनी पाहिले. आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर सुरू असलेले विविध उपक्रम बघून त्यांनी समाधान व्यक्त केले. या भागात सुरू असलेल्या स्थानिक बियाणे संवर्धन चळवळीला बळकटी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत कार्यक्रमांना दिशा देण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक निर्मला वायाळ, लता बांबळे उपस्थित होते. भेटीचे नियोजन बायफचे योगेश नवले, लीला कुऱ्हे, राम कोतवाल, किशोर गभाले, रोहिदास भरीतकर, रामकृष्ण भांगरे, खंडू भांगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या भेटीसाठी कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेचे संचालक यांनीही विशेष परिश्रम घेऊन सहकार्य केले.
संपादन : अशोक मुरुमकर