आता उरला एकच दिवस! ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी

वसंत सानप 
Tuesday, 29 December 2020

जामखेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आँनलाईन फॉर्म भरण्यात उमेदवारांना अडचणी येत आहेत. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.

जामखेड (अहमदनगर) : जामखेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आँनलाईन फॉर्म भरण्यात उमेदवारांना अडचणी येत आहेत. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. एक फॉर्म ऑनलाईन करायला कमीत कमी अर्धा तास वेळ जातोय. तेही साईट सुरु असेल तर अन्यथा मोठा अडथळा निर्माण होतोय. 

वारंवार सर्वर डाऊन होण्यामुळे आँनलाईन सेंटर चालविणारेही हतबल होत आहेत. त्यामुळे इच्छुकांना ताटकळत रहावे लागले. काहींना तर तब्बल दोन- दोन दिवस प्रतिक्षा केली तरी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. पहाटेपर्यंत आँनलाईन सेंटरचे काम सुरू होते.

आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला भराव्या लागणाऱ्या डिपाँझिटच्या रक्कमेच्या दहापट तर खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. जामखेड सेतूकेंद्र वगळता तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे कामकाज करणाऱ्या कोणत्याच ''आँनलाईन'' सेंटरवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. सहा दिवसापासून तालुक्याच्या गावाला खेट्या मारुन खर्चाच्या अतिरिक्त भारामुळे उमेदवारांचे निवडणूकी अधिच कंबरडे मोडले आहे. तसेच प्रक्रीयाही पूर्ण झाली नाही, अशी व्यथा अनेक गावातील इच्छुक व्यक्त करीत आहेत. स्वघोषणा पत्रासाठी वेगळाच वेळ तर नामनिर्देशन पत्र आँनलाईन करण्यासाठी वेगळा वेळ मोजावा लागतो आहे. मात्र उमेदवारी अर्जात काही गडबड केली जाईल म्हणून बोलण्यासाठी पुढे येण्याचे 'धारिष्ठ'ही कोणी दाखवित नाही.

'ग्रामपंचायत' स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया. येथूनच लोकप्रतिनिधी घडतात असे बोलले जाते. येथील निवडणूका बिगर राजकीय चिन्हावर लोकशाही पध्दतीने होतात; असा समजले जाते. मात्र आलीकडे निवडणूक प्रक्रीयेच्या सुरुवातीपासूनच तोंड दाबुन बुक्याचा मार सोसण्याची वेळ इच्छुक उमेदवारांना सोसावी लागते आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून कागदपत्रांची पिशवी घेऊन होणारे गाव कारभारी तालुक्याच्या गावाला येतात. चहा, वडापाव आणि जमलच तर श्रम परीहार करुन दिवसभर तहसील व सेतू कार्यालयाच्या परिसरात रेंगाळताना दिसतात. सहा दिवस गर्दीने फुलून गेलेला परिसर पहायला मिळतो. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत थांबूनही अर्ज ऑनलाइन होत नसल्याने इच्छुक उमेदवारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
तालुक्यात 48 ग्रामपंचायतीच्या 158 प्रभागातून 168 मतदान केंद्रावर ग्रामपंचायतीच्या 417 जागांसाठी निवडणूक होत असून याकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा केवळ बुधवार (ता. 30) हा शेवटचा दिवस राहिलेला आहे. मात्र उमेदवारी अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करता करता उमेदवारांचे नाकीनऊ आले आहेत. प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ऑनलाइन प्रक्रियेमध्ये हे उमेदवार अडकले आहेत.

सहा ते सात प्रकारचे करावे लागतात 'स्व' घोषणापत्र

  • - अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर हमीपत्र आणि घोषणापत्र निवडणूक अधिकाऱ्याला द्यावे
  • - खर्च हिशेब देताना हमीपत्र, अपत्यांचे प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, डिपॉझिटची पावती द्यावी लागेल.
  • - एका प्रभागात एका उमेदवाराचे चिन्ह दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही
  • - ग्रामपंचायतीचा थकबाकीदार, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जातपडताळणी करिता आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला कागदपत्रे आँनलाईन करुन प्रस्ताव सादर करावा लागतोय व पोहच पवती घेऊन ती अर्जासोबत जोडावी लागते आहे. निवडून आल्यानंतर वर्षभरात जातपडताळणी सादर करण्याचे स्वघोषणा पत्रही सादर करावे लागते आहे.  बँकेचे निवडणूकी करिता तात्पुर्ते खाते उघडून एटीएम असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या जाचक आडचणीमुळे प्रक्रीयेस दिरंगाई होते आहे.

असा करता येईल खर्च

  1. 7 आणि 9 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 25 हजार रुपये
  2. 11 आणि 13 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 35 हजार रुपये
  3. 15 आणि 17 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 50 हजार रुपये 

अशा आहेत डिपाँझिटच्या रक्कमा

  1. खुल्या प्रवर्ग उमेदवारांसाठी 500 रुपये डिपॉझिट 
  2. SC- ST, OBC उमेदवारांसाठी 100 रुपये डिपॉझिट 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficulties in filling up online candidature application