
काही दिवसातील संततधार पाऊस, ढगाळ हवामान व कमी अधिक तापमान यामुळे कपाशीवर विविध रोगांचा पादुर्भाव झाला असून त्यावर औषध फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरु केली आहे.
अमरापूर (अहमदनगर) : काही दिवसातील संततधार पाऊस, ढगाळ हवामान व कमी अधिक तापमान यामुळे कपाशीवर विविध रोगांचा पादुर्भाव झाला असून त्यावर औषध फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरु केली आहे. सर्वाधिक क्षेत्र असलेल्या कपाशीला काही वर्षापासून नवनवीन रोगांचा पादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत असून खर्चाने शेतकरी जेरीस आले आहेत.
यावर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शेतक-यांनी कपाशीची मोठया प्रमाणावर लागवड केली आहे. यावर्षी 41 हजार क्षेत्रावर कपाशील लागवड करण्यात आली आहे.
लागवडीनंतर काही दिवस सतत पावसाची संततधार लागुन राहिल्याने जमिनीतील ओलावा मोठया प्रमाणावर वाढला. तर काही सखल भागात पिकात पाणी साचल्याने ते पिवळे पडले. पंधरा दिवस ढगाळ हवामानामुळे व जमिनीत वाफसा नसल्याने कपाशीची वाढ खुंटली. सद्य स्थितीत आठ दिवसापासून पाऊसाने उघडीप दिली आहे. मात्र कपाशी पिकावर मावा, तडतुडे, पांढरी माशी, बोंडअळी, पान कोकडणे, पातेगळ या सारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. जमिनीतील सततचा ओलावा, ढगाळ हवामान, पावसाचे कमी अधिक प्रमाण, तापमानातील तफावत यामुळे कपाशीची पाने सुकणे, पिवळी पडणे, वाढ खुंटणे ही लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामुळे या विविध आजारावर औषधांची फवारणी करण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरु आहे.
आतापर्यंत मशागत, बियाणे व खते, फवारणी, खुरपणी यावर मोठा खर्च झालेला असल्याने आता पुन्हा फवारणीसाठी भुर्दंड सोसावा लागत आहे. फवारणीसाठी झाडाच्या उंचीनुसार व घनतेनुसार एकरी सहाशे ते 1 हाजर रुपये खर्च येतो. त्यामुळे कापसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. सद्य स्थितीत उष्णता प्रचंड वाढली असल्याने पावसाची गरज आहे. अन्यथा मोठया प्रमाणावर पाते गळ होण्याची शक्यता आहे. आठ दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्याने कपाशीवरील रोग थांबविण्यासाठी जिरायती भागातील शेतक-यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. तर बागायती शेतक-यांनी कपाशीला पाणी देण्यास सुरुवात केली आहे.
कपाशीवर वाढलेल्या या विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतक-यांची कृषी दुकानदारांकडे गर्दी वाढली आहे. मात्र कोणत्या रोगांवर कोणते औषध फवारावे याबाबत शेतकऱ्यांकडे माहिती व ज्ञानाचा अभाव आहे. त्याचा गैरफायदा कृषी दुकानदार घेत असून अनावश्यक कोणतेही महागडे औषधे गळ्यात मारुन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. कृषी विभागाकडून शास्त्रशुध्द माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांची सर्रास लुबाडणूक सुरू आहे.
शेतक-यांनी गरज असेल तरच फवारणी करावी. रोग नसतांना फवारणी केल्यास पिकाच्या रोग प्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. पिकात पाणी साचणार नाही त्याची दक्षता घ्यावी. व स्वस्तातल्या औषध फवारणी व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर करावा. अधिक मार्गदर्शनासाठी कृषी सहाय्यकाशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड यांनी केले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर