पगार व पदाचा विचार न करता मतदान केंद्राध्यक्षांच्या नियुक्त्या; प्राथमिक शिक्षकात नाराजी

सचिन सातपुते
Tuesday, 29 December 2020

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचारी म्हणून अनेक मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांची (बी. एल. ओ.) नियुक्ती केली आहे.

शेवगाव (अहमदनगर) : तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचारी म्हणून अनेक मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांची (बी. एल. ओ.) नियुक्ती केली आहे.

जिल्ह्यात कोणत्याही तालुक्‍यात प्राथमिक शिक्षकांतील बीएलओंची प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती केली नाही. तसेच तालुक्‍यातील मतदान केंद्राध्यक्षांच्या नियुक्‍त्या करताना देखील मुळ पगार व पदाचा विचार न करता शिक्षकांच्या नियुक्‍त्या केल्यामुळे केवळ प्राथमिक शिक्षकांवरच अन्याय झाला आहे. या नियुक्‍त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात यासाठी प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीने तहसिलदार अर्चना भाकड- पागिरे यांना निवेदन दिले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिक्षक बॅंकेचे संचालक दिलीप औताडे म्हणाले की, तालुक्‍यात 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी कर्मचारी नियुक्तीचे आदेशही शिक्षकांना देण्यात आले आहेत. मात्र त्यामध्ये मतदार नोंदणी व इतर मतदार यांदयांचे कामे करणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना ही नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेळी मतदार याद्यांचे व ग्रामपंचायत निवडणुकीचे काम त्यांनी कसे करावे. संपूर्ण जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारच्या नियुक्‍त्या नसताना नेमकी शेवगाव तालुक्‍यातच याचा विचार करण्यात आलेला नाही. या नियुक्‍त्या व तसेच मुळ पगाराचा व पदाचा विचार न करता केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्‍त्या दिलेल्या प्राथमिक शिक्षकांचे आदेश तात्काळ रद्द करावेत. 

बाळकृष्ण कंठाळी, सचिन वांढेकर, प्रल्हाद गजभिव, राकृष्ण काटे, विलास लवांडे, अरुण पठाडे, रमेश गोरे, विनोद फलके, बाळासाहेब डमाळ, प्रकाश लबडे, अशोक घुमरे, वसीम शेख उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dissatisfaction among primary teachers over appointments at polling stations