जिल्हा बँकेवर जाण्यासाठी पारनेरमध्ये घमासान; लंके,शेळके, गायकवाड यांचेही अर्ज

मार्तंड बुचुडे
Sunday, 31 January 2021

शेळके यांचा सामना अाता रामदास भोसले व राहुल शिंदे यांच्या बरोबर होणार की या दोघांपैकी कोणीतरी माघार घेणार व तालुक्यातील लढत दुरंगी होणार की तिरंगी हे मात्र, अर्ज माघारीनंतरच समजणार आहे. 

पारनेर ःजिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज माघारीसाठी अद्याप वेळ आहे.  मात्र, अाता तालुक्यातून सेवा संस्था मतदार संघातून बँकेच्या संचालक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके तसेच विद्यमान संचालक उदय शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत.

शिवसेनेच्या वतीने रामदास भोसले व भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच विखे गटाच्या वतीने राहुल शिंदे यांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत. अाता नेमकी कोण माघार घेणार व कोणात लढत होणार की मागील पंचवार्षिक प्रमाणे शेळके यांना बिनविरोध देणार याचीच चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांची आघाडी आहे. तरीही तालुक्यात मात्र, त्यांची आघाडी होण्याची  शक्यता नाही. त्यामुळे या वेळी शेळके यांना बिनविरोध निवडून जाण्याचे संकेत दिसत नाहीत. 

आमदार लंके यांनी अर्ज दाखल केल्याने नेमकी उमेदवारी कोणाची राहाणार या चर्चेला उधाण आले आहे. जर माजी आमदार विजय औटी यांचा उमेदवारी अर्ज असता तर आमदार लंके यांची उमेद्वारी ऩिश्चित मानली जात होती. आता औटी यांनी अर्ज दाखल न केल्याने लंके आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता निश्चित आहे. 

पवार-शेळके हेलिकॉप्टरमधून मुंबईला रवाना

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे नुकतेच जिल्हा दौ-यावर आले होते. त्या वेळी शेळके व पवार हे एकत्र  हेलीकॉप्टरमध्ये मुंबईस रवाना झाल्याने त्यांची उमेद्वारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे.  
    
शेळके यांचा सामना अाता रामदास भोसले व राहुल शिंदे यांच्या बरोबर होणार की या दोघांपैकी कोणीतरी माघार घेणार व तालुक्यातील लढत दुरंगी होणार की तिरंगी हे मात्र, अर्ज माघारीनंतरच समजणार आहे. 

जिल्हा बँकेचे संचालक पद हे जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे या पदाला जिल्हा पातळीवर महत्व प्राप्त झाले आहे. बहुतेक तालुक्यातील आमदार किंवा राजकीय वजनदार व्यक्तीच आतापर्यंत या पदावर संचालक म्हणून निवडून दिले आहेत.

१०५ सेवा संस्थांचे मतदार

तालुक्यात 105 सेवा संस्थेचे मतदार आहेत. सेवासंस्थांचे ठराव करतानाच शेळके यांनी त्यात लक्ष घातले होते. ठऱाव कोणाच्या नावे करावयाचा हे सुद्धा अनेक ठिकाणी  शेळके यांनीच लक्ष घालून ठरविल्याने शेळके यांचा  विजय सोपा मानाला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Bank Applications from Lane Shelke Gaikwad also