esakal | श्रीगोंदे : भोंदुबाबांने लुटलेले पैसे परत मिळाले; पण गेले कुणाच्या खिशात?
sakal

बोलून बातमी शोधा

fraud

भोंदुबाबांने लुटलेले पैसे परत मिळाले; पण गेले कुणाच्या खिशात?

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (जि. नगर) : काष्टीतील तरुण पैसे दुप्पट करून देणाऱ्या महाराजाच्या जाळ्यात अडकले. काही लाखांची रक्कम महाराजाने लुटली. लुटले गेलेल्या लोकांनी नंतर दीड लाखाची चोरी झाल्याची फिर्याद पोलिसांत दिली. खरी घटना पोलिसांना समजल्यावर त्यांनी महाराजाला ताब्यात घेतले. चोरीच्या फिर्यादीत पुन्हा नवा ट्विस्ट आला आणि पुरवणी जबाबात चोरी साडेअकरा लाखांची झाल्याचे दाखविले. याचदरम्यान रक्कम टक्केवारी काढून परत दिली, मात्र यात चांदी नेमकी कोणाची झाली, याची चर्चा रंगली आहे.

काष्टी परिसरात राहणारा हा महाराज मूळचा अकोले जिल्ह्यातील असल्याचे समजते. त्याने काष्टी परिसरातील तरुणांची अडचण ओळखून, काही मध्यस्थांच्या मदतीने पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविले. त्या तरुणांनी एकत्र येत मोठी रक्कम महाराजाच्या हाती सोपविली. रक्कम घेऊन त्याने पोबारा केला. लुटले गेल्याचे लक्षात आल्यावर संबंधित तरुणाने पोलिसात दीड लाखाची रक्कम चोरीला गेल्याची तक्रार दिली. मात्र, खरी माहिती पोलिसांनी काढली आणि रक्कम मोठी असल्याचे समजताच श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील कर्तबगार पोलिसांची टीम तपासासाठी रवाना झाली. संबंधित महाराज उस्मानाबादेत पकडला. त्याच्याकडून मोठी रक्कम हस्तगत झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, अगोदरच्या फिर्यादीत पुरवणी जबाब घेत रक्कम साडेअकरा लाख दाखविण्यात आली. हा सगळा गोंधळ सुरू असताना पकडलेला आरोपी, त्याच्याकडून सत्तर लाख जप्त केल्याची ओरड करीत असल्याची चर्चा पोलिस ठाण्यातून थेट चौकात आली. त्यामुळे पोलिसांभोवतीच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्याची रक्कम चोरीला गेली, त्याने अगोदर थोडी रक्कम का दाखविली, अशी चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे, एरवी एक आरोपी पकडला तरी घाईने माध्यमांना पत्रके देणाऱ्या पोलिसांनी, घटना घडून दोन दिवस झाल्यानंतर व आरोपी, रक्कम हस्तगत केल्यानंतरही माध्यमांना माहिती न दिल्याने संशय वाढला आहे.

हेही वाचा: PHOTOS : बैलाच्या पाठीवर रंगले राजकारणाचे प्रतिबिंब

चोरावर मोर नेमके कोण?

जे लुटले गेले, त्यांना सगळी रक्कम परत मिळाल्याचा दावा पोलिस करीत आहेत. मात्र, ज्याने लुटले, तो त्याच्याकडून ७० लाखांची रक्कम घेतल्याचा आरोप करीत असल्याची चर्चा आहे. यात नेमके खरे कोण आणि खोटे कोण, याची चौकशी व्हावी. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यावर रक्कम वाढत असेल तर पोलिस ते मान्य करीत नाहीत. मग याच ठिकाणी तसे घडल्याने, यात काहीतरी काळेबेरे असल्याची चर्चा आहे.

चर्चा काहीही होते. वास्तव जे दाखल आहे, तेच आहे. फिर्यादीने अगोदर कमी रक्कम दाखवली, नंतर वाढवली. त्यापेक्षा जास्त रक्कम मिळाली नसून, आरोपी काय म्हणतो, चर्चा काय होते, याला महत्त्व नाही.

- रामराव ढिकले, पोलिस निरीक्षक, श्रीगोंदे

हेही वाचा: पर्यटकांना खुणावतोय निसर्गसौंदर्याने नटलेला रामेश्‍वर धबधबा

loading image
go to top