esakal | पर्यटकांना खुणावतोय निसर्गसौंदर्याने नटलेला रामेश्‍वर धबधबा
sakal

बोलून बातमी शोधा

rameshwar waterfall

पर्यटकांना खुणावतोय निसर्गसौंदर्याने नटलेला रामेश्‍वर धबधबा

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (जि. नगर) : पाचशे फूट उंच कड्यावरून खोल दरीत कोसळणाऱ्या श्रीक्षेत्र रामेश्वर धबधब्याने वीस वर्षांत पहिल्यांदाच रौद्र रूप धारण केले आहे. हे नयनरम्य दृश्‍य पर्यटकांना खुणावत आहे.

जामखेडपासून अकरा किलोमीटर, नगरपासून नव्वद, तर बीडपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर असलेले, मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र रामेश्वर हे तीर्थस्थळ सौताडा (ता. पाटोदा) येथे आहे. येथील धबधब्यामुळे अन् निसर्गाच्या मुक्त हस्ते उधळणीने नटलेल्या निसर्गामुळे ते राज्यात नावारूपाला आलेले आहे.

दर वर्षी श्रावणात धबधबा केव्हा कोसळतो, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात. दोन दिवसांपूर्वी या परिसरात जोरदार पाऊस झाला. ओढे-नाले ओसंडून वाहू लागले. विंचरणा नदीवरील तलाव पूर्ण क्षमतेने भरला अन् ओसंडून वाहू लागला. तलावापासून खालच्या बाजूला तीन किलोमीटरवर, पाचशे फूट खोल दरीत श्रीक्षेत्र रामेश्वर तीर्थस्थळ असून, येथील कड्यावरून पाण्याचा प्रवाह स्वतःला खोल दरीत झोकून देतो. हा धबधबा रविवारपासून कोसळू लागला आहे.

हा धबधबा ज्या ठिकाणी कोसळतो, तेथे डोह तयार झालेला आहे. या डोहाला देवकुंड म्हणतात. या देवकुंडाचे पाणी कधीच न अटल्याने त्याच्या खोलीचा ठाव अद्याप लागलेला नाही. हे तीर्थक्षेत्र दंडकारण्याच्या पायथ्याशी दरीत विसावलेले आहे. या दरीत तीर्थक्षेत्राच्या पश्चिम बाजूला मोठी वेधशाळा आहे. त्याचबरोबर हनुमान मंदिरदेखील आहे. या ठिकाणी महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांनी भेट दिली असून, त्यांचेदेखील मंदिर या ठिकाणी आहे. प्रभू रामचंद्रांचे व सीतामातेचे मंदिर आहे. येथील दरीत खळखळणारे ओहळ, पक्ष्यांचा किलबिलाट, दुर्मिळ औषधी वनस्पतींचा खजिना अनेकांना साद घालतो. धबधबा कोसळू लागल्याने पर्यटकांची गर्दीही वाढली आहे.

धबधबा कोसळायला सुरवात झाली, की पहाटेच्या वेळी दोन किलोमीटर अंतरापर्यंत जमिनीचा कंप आणि धबधब्याचा आवाज ऐकायला येतो. गावात भूकंपासारखे हादरे ऐकू येतात. आजही आम्ही ते अनुभवतो आहोत.

- अच्युत शिंदे, ग्रामस्थ, सौताडा

हेही वाचा: शॉर्टसर्किटमुळे कांदा चाळीला आग; लाखो रुपयांचे नुकसान

हेही वाचा: अहमदनगर : आधी मुलीला संपवलं, नंतर आई-बापांनी केली आत्महत्या

loading image
go to top