डॉ. बोरगेचा अटकपूर्व जामीन फेटाळला; अल्पवयीन मुलाला मारहाण प्रकरण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

महापालिकेतील महिला कर्मचाऱ्याच्या घरात जाऊन पार्टी करत अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे याने दाखल केलेला अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज आज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला.

नगर : महापालिकेतील महिला कर्मचाऱ्याच्या घरात जाऊन पार्टी करत अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे याने दाखल केलेला अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज आज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. डॉ. बोरगेसह आपत्ती व्यवस्थापन विभागप्रमुख शंकर मिसाळ व दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच हे दोन्ही अधिकारी पसार झाले आहेत. 

अवश्‍य वाचा - महापालिकेची पुन्हा चूल पेटली!

महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याच्या घरात रात्री जाऊन तेथे डॉ. बोरगे, मिसाळ व अग्निशमन विभागातील लिपिक बाळू घाटविसावे यांनी पार्टी केली. या पार्टीला विरोध करत असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या अल्पवयीन मुलाला मारहाण केली, तसेच त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे आरोप करत मुलाने बोरगे, मिसाळ, घाटविसावे व महिला कर्मचाऱ्याच्या विरोधात ही फिर्याद दिली आहे. 

या अल्पवयीन मुलाने आरोपीकडून जिवाला धोका असल्याचे सांगत त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, असे न्यायालयात सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी मुलाला चार अज्ञात व्यक्‍तींनी मारहाण करत गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावले होते. फिर्यादीतर्फे ऍड. महेश शेडाळे यांनी बाजू मांडली. त्यांना ऍड. अरुण बनकर यांनी साह्य केले. 

डॉ. बोरगे महापालिकेचे जबाबदार अधिकारी असूनही गुन्हे करतात. त्याच्या बेजबाबदार वागणुकीमुळे यापूर्वीही खातेनिहाय चौकशा सुरू आहेत. त्यास एकदा निलंबितही करण्यात आले होते, असे ऍड. शेडाळे यांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायालयाने डॉ. बोरगेचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यामुळे डॉ. बोरगेच्या अडचणीत वाढ झाली आहे. डॉ. बोरगे उच्च न्यायालयातही दाद मागू शकतो, असे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Borge's pre-arrest bail denied; Juvenile assault case