esakal | चर्चा तर होणारच ः विखेंचा रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून पाहुणचार

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar-Sujay Vikhe Patil's alliance
चर्चा तर होणारच ः विखेंचा रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून पाहुणचार
sakal_logo
By
दत्ता उकीरडे

राशीन : राज्याच्या राजकारणात कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहित पवार आणि विखे घराण्यातील वारसदार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची चर्चा असते. दोन्ही वेगवेगळ्या पक्षांत असले तरी त्यांच्यात दोस्तीचे नाते आहे. मध्यंतरी चला हवा येऊ द्या या टीव्हीवरील शोमध्येही ते झळकले होते. या दोघांमुळेच पवार आणि विखे कुटुंबातील वितुष्ट कमी झाल्याची चर्चा होती.

भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या दौऱ्यात त्यांच्या दिमतीला चक्क राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिसले. त्यामुळे राजकीय गोटात नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

खासदार डॉ. विखे पाटील राशीन येथील कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी आले असताना, पंचायत समितीच्या माजी सभापती अश्‍विनी कानगुडे यांचे पती युवक नेते श्‍याम कानगुडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस शहाजी राजेभोसले हे विशेष करून त्यांच्या दिमतीला होते.

हेही वाचा: खळबळजनक ः अॉक्सीजन न मिळाल्याने नगरमध्ये सातजणांचा मृत्यू

विशेष म्हणजे कानगुडे व राजेभोसले हे रोहित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र, ही मंडळी भाजप खासदारांच्या दिमतीला पाहून अनेक जण अचंबित झाले. कोविड सेंटरची पाहणी करून झाल्यावर राजेभोसले यांच्या कार्यालयात खासदार विखे पाटील यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी राजकीय गप्पांची मैफीलही रंगली.

कोरोनाच्या सद्यःस्थितीवर चर्चा झाली, तसेच चहापानाने बैठकीची सांगता झाली. या बैठकीला दत्ता गोसावी, एकनाथ धोंडे, पांडुरंग भंडारे, सोयब काझी, भीमराव साळवे, उमेश शेटे, प्रसाद मैड आदी उपस्थित होते.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कोणत्याही राजकीय विषयांवर सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर तुटून पडताना दिसतात. सुरवातीच्या काळात आमदार रोहित पवार यांना गळ्यातील ताईत मानणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजप खासदारांच्या दिमतीला आलेले पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रोहित पवारांचा उदारमतवाद

सध्या खासदार सुजय विखे पाटील रेमडेसिव्हिर बेकायदा वाटल्याने अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरूद्ध राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे रोहित पवार यांचे कट्टर कार्यकर्ते खासदार विखे पाटलांच्या दिमतीला असल्याचे दिसून आले. खरे तर रोहित पवार हे राजकीय वैर मानतच नाहीत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार, माजी मंत्री राम शिंदे यांची लगेच भेट घेतली होती. ती भेटही राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चिली गेली होती.