डॉ. सुजय विखे पाटलांचा पुन्हा मंत्रिपदाबाबत पुनरूच्चार

सतीश वैजापूरकर
Monday, 21 December 2020

नूतन नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांना कमी कालावधी मिळाला. ते सर्वांना सोबत घेऊन काम करतील. जगन्नाथ गोंदकर यांना या पदाची संधी मिळाली नसली, तरी ते आमच्या जवळ असल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले.

शिर्डी ः आमच्या विरोधकांना नशिबाच्या जोरावर योगदानाच्या तुलनेत दुपटीने संधी मिळाली. आमच्या वाट्याला मात्र संघर्ष आला. सध्या लोक मला दोनच प्रश्न विचारतात. तुम्ही केंद्रात मंत्री होणार का, राज्यात बदल होईल का? साईबाबांच्या कृपेने केंद्रात मंत्री झालो, तरी मी आहे असाच कार्यकर्त्यांसोबत राहीन, अशी ग्वाही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. 

डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांचा आज सत्कार करण्यात आला. तसेच भाजपच्या दिनदर्शिकीचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी डॉ. विखे पाटील बोलत होते. भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, जगन्नाथ गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, सचिन शिंदे, रवींद्र गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, नंदकुमार गोंदकर, पोपट शिंदे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - निघाली नगर-करमाळा महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा निघाली

डॉ. विखे पाटील म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप चांगले काम करतो आहे. संकट काळात भाजप आमच्या कुटुंबामागे उभा राहिला. खासदार झालो, तरी माझ्यात काही बदल झाला नाही. साई संस्थानमध्ये कुणीही विश्वस्त होऊ द्या. कार्यकर्त्यांनी डळमळीत होऊ नये. जे आमच्यासाठी निवडणुकीत पळतात, ते आमच्यासाठी पदाधिकाऱ्यांपेक्षाही अधिक जवळचे असतात.'' 

नूतन नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांना कमी कालावधी मिळाला. ते सर्वांना सोबत घेऊन काम करतील. जगन्नाथ गोंदकर यांना या पदाची संधी मिळाली नसली, तरी ते आमच्या जवळ असल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले.

नगराध्यक्ष गोंदकर म्हणाले, की गेल्या 50 वर्षांपासून आमचे कुटुंब भाजपच्या विचारधारेसोबत जोडले गेले आहे. विरोधात असतानाही आम्ही कधीही विरोधासाठी विरोध, अशी भूमिका घेतली नाही. नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहोत. 

कोते, शेळके "कमळा'सोबत राहतील 
डॉ. विखे पाटील म्हणाले, की माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांच्याबाबत 10 वर्षे भोकाडी दाखविली गेली. मात्र, ते आमच्यासोबत राहिले. आगामी नगरपंचायत निवडणुकीत ते आणि नगरसेवक अभय शेळके "कमळा'च्या चिन्हासोबत राहतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आमच्यासाठी जिवाचे रान करणारा सदैव आमचा असतो. नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, मंगेश त्रिभूवन व नितीन कोते यांनी आमच्या शब्दाला किंमत दिली याला महत्त्व आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Sujay Vikhe Patil reiterates his ministerial post