निघाली बरं का, नगर-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा निघाली

The tender for four-laning of Nagar-Solapur highway was issued
The tender for four-laning of Nagar-Solapur highway was issued

कर्जत : कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या व अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर-सोलापूर या (राष्ट्रीय महामार्ग क्र.५१६ (अ) ) या महामार्गाच्या चौपदरीकरण कामाची इ-निविदा नुकतीच जाहीर झाली आहे.

अत्यंत महत्वाचा प्रश्न मार्गी लागल्याने आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले आहेत. नगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी क्र.५१६ (अ) महामार्गाच्या नगर ते घोगरगाव या ३८.७७५ कि.मी. कामासाठी ५४७.१६ कोटी एवढा निधी तर घोगरगाव ते नगर-सोलापूर हद्द या ४१.६१५ किमी कामासाठी ६४१.४५ कोटी एवढा निधी दोन पॅकेजमध्ये राज्य शासनाच्या भारतमाला परीयोजनेतून उपलब्ध करण्यात आला आहे.

अनेक अडचणींमुळे गेली तीन ते चार वर्षांपासून या रस्त्याच्या कामाबाबतची सर्व कार्यवाही थांबली होती. महामार्गासाठी भु-संपादनाचा प्रश्न तसेच काही गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या नलिका व इतर अडचणींमुळे या कामास अडथळा निर्माण झाला होता. आमदार रोहित पवारांनी या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन सर्व अडचणी समजावून घेतल्या. त्यांनी तात्काळ नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसह उप वनसंरक्षक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण प्रकल्प संचालक, कर्जत, श्रीगोंदे, नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी, सहाय्यक संचालक नगर रचना विभागाचे अधिकारी, नगर रचनाकार, वीज विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद लघुपाट बंधारे विभागाचे अधिकारी आदी सर्वच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ज्या-त्या विभागास आपापली जबाबदारी देऊन कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

एका महिन्याच्या कालावधीनंतर आमदार पवारांनी दुसरीही बैठक त्याच ठिकाणी घेतली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती देण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी आमदार रोहित पवारांचा पॅटर्न राबवून सर्व अडचणी मार्गी लावण्यात अधिकाऱ्यांनाही यश आले.

भूसंपादनाची रक्कमही शेतकऱ्यांना मिळाली. त्यानंतर महामार्गाच्या या कामाचा प्रस्ताव सर्व अटी-शर्ती पूर्ण करून दिल्लीला पाठवण्यात आला. एवढ्यावर आमदार पवार थांबले नाहीत. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दोन वेळा भेट घेऊन महामार्गाच्या तात्काळ मंजुरीसाठी चर्चा व विनंती केली होती.

खासदार सुजय विखे यांनीही या रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा केला होता. केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून मंजुर करून आणलेल्या या महामार्गामुळे अनेक तालुक्यांनाच नव्हे तर जिल्ह्यांना वैभव प्राप्त होणार आहे.

कर्जत-जामखेडच्या जनतेने निवडून दिल्यानंतर अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. जामखेडचे पोलिस प्रशिक्षण केंद्र असेल नाही तर कर्जतची एमआयडीसीची मंजुरी असेल. कुकडीच्या पाण्याचेही योग्य नियोजन केले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नगर-सोलापूर महामार्गाचा होता. त्याच्या चौपदरीकरणाची निविदा मंजूर झाली आहे.

- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com