
माळीवाडा भागातील ड्रेनेज तुंबल्याने मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
अहमदनगर : शहरातील माळीवाडा भागातील ड्रेनेज तुंबल्याने मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात स्थानिक नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना या संदर्भात माहिती दिली. महापालिका प्रशासनाने ड्रेनेज दुरूस्ती केली.
शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेने भुयारी गटारीचे काम सुरू केले आहे. माळीवाडा भागात सध्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. न्यामतखानी मोहल्ला भागापर्यंतचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी दोन महिने लागण्याची शक्यता आहे. या कामामुळे जुन्या ड्रेनेज लाईनवर ताण निर्माण होऊन ड्रेनेज तुंबत आहेत.
महापालिका सफाई कामगारांच्या संपामुळे ड्रेनेज सफाई करण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे कामगार नव्हते. त्यामुळे माळीवाडा भागातील वाडियापार्क ते जुनी महापालिका इमारत, शिवमप्लाझा जवळील रस्ता, पंचपीर चावडी ते माळीवाडा वेस, भोपळे गल्ली या भागांत ड्रेनेजचे पाणी आले होते. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात स्थानिक नगरसेवकांनी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना कळविले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने ड्रेनेज दुरूस्ती केली. त्यामुळे ड्रेनेजमधून मैला मिश्रीत पाणी येणे बंद झाले आहे. तरी रस्त्यावर ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी तसेच असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संपादन : अशोक मुरुमकर