श्रीरामपूर तालुक्यात सलग पावसामुळे यंदा खरीप जोमात

गौरव साळुंके
Sunday, 16 August 2020

ग्रामीण भागात दोन दिवसांपासुन सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे हवामानात काही अंशी गारवा निर्माण झाला आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दोन दिवसांपासुन सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे हवामानात काही अंशी गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यासह ग्रामीण भागातील अनेक रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे.

दिवसभर सुरु असलेल्या पावसाने सर्वच रस्त्यावरील वाहनाची गर्दी मंदावल्याचे दिसुन आले. शहरासह तालुक्यातील बेलापूर, टाकळीभान, नाऊर, खंडाळा, उक्कलगाव, निमगावखैरी, खोकर, माळवाडगाव परिसरात दिवसभर पाऊस सुरु असल्याने सोयाबीन, कापुस, मका असे विविध खरीप पिके बहरली आहेत.

दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने जमिनीतील ओलावा वाढला आहे. सध्या सुरु असलेला पाऊस खरीपसाठी उपयुक्त ठरणार असल्याची चर्चा सध्या ग्रामीण भागात सुरु आहे. तालुक्यातील गोदावरी आणि प्रवरा दोन्ही नद्या सध्या प्रवाहीत झाल्या आहे. मागील दोन दिवसांची तालुक्यातील पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आज श्रीरामपूर मंडलात 23 मिलीमिटर, बेलापूर मंडलात 32 मिलीमिटर, उंदिरगाव मंडलात 19 मिलीमिटर तर टाकळीभान मंडलात 25 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. तसेच काल श्रीरामपूर मंडलात तीन मिलिमिटर, बेलापूर मंडलात दोन मिलीमिटर, उंदिरगाव मंडलात पाच मिलीमिटर तर टाकळीभान मंडलात दोन मिलिमिटर पावसाची नोंद झाल्याची माहिती महसुल प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाच्या धास्तीने अनेकांनी पावसात घराबाहेर पडणे टाळले. महत्वाच्या कामासाठी घराबाहेर निघालेल्या नागरीकांकडे छत्र्यांसह रेनकोट दिसुन आले. सलग सुरु असलेल्या पावसात मात्र मोकाट जणांवराची हाल झाली. शहरातील मोकाट जणांवरांनी बंद असलेल्या दुकानासमोरील आवारात आसरला घेतल्याचे दिसले. रिपरिप पावसामुळे ग्रामीण भागातील शेतीकामे थांबलेली होती.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to continuous rains in Shrirampur taluka kharif is in full swing this year