पंधरा दिवस लागून राहिलेल्या पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांना वेग

राजू घुगरे
Thursday, 27 August 2020

पंधरा दिवसांपासून लागून राहीलेल्या संततधार पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील खरीप पिकांतील आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे.

अमरापूर (अहमदनगर) : पंधरा दिवसांपासून लागून राहीलेल्या संततधार पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील खरीप पिकांतील आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. एकाच वेळी वापसा स्थितीमुळे कपाशीतील औत हाकणे, अळे खुरपणी, खत घालणे, फवारणी यासह मुग तोडणीच्या कामांना मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.

तालुक्यासह परिसरात यंदा समाधानकारक कारक पाऊस असून पंधरा दिवस पावसाची संततधार सुरू होती. सुर्यदर्शन न झाल्याने कपाशी, बाजरी, तूर, मूग, सोयाबीनमध्ये पाणी साचून ती पिवळी पडू लागली होती. ढगाळ वातावरणाने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. शेतात वापसा नसल्याने गवतामुळे पिकांच्या वाढीवरही परिणाम झाला होता.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
चार पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने व ऊन पडू लागल्याने खरीप पिकांतील विविध कामांनी वेग घेतला आहे. तालुक्यातील सर्वाधीक क्षेत्रातील कपाशीच्या पिकांत औत पाळी हाकणे, अळे खुरपणी, फवारणी, खत घालणे या कामांना प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. काढणीस आलेल्या मुगाची शेंगातोडणीही सुरू झाली आहे. एकाच वेळी सर्वत्र झालेल्या वाफसा स्थितीमुळे मजूरांची टंचाई निर्माण झाली असून रोजंदारी वाढू लागली आहे. परिसरातील आव्हाणे, वाघोली, ढोरजळगाव यासह मोठे क्षेत्र असलेल्या गावात मजूरांची वाहनांतून ने आण सुरू झाली आहे.

कपाशीवर पातेगळ,बोंडअळी,पानं कोकडणी,अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून कोणत्या रोगांवर कोणते औषध फवारावे याबाबत शेतकऱ्यांकडे माहिती व ज्ञानाचा अभाव आहे.त्याचा गैरफायदा कृषी दुकानदार घेत असून कोणतीही महागडी औषधे गळ्यात मारुन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.कृषी विभागाकडून शास्त्रशुध्द माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू आहे.

जिरायत भागातील शेतातील कपाशीवर फवारणीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने विहीर, कुपनलिका किंवा घरून पाणी न्यावे लागत आहे.त्यासाठी बैलगाडी, मोटारसायकल व प्रसंगी डोक्यावरही पाणी वाहून नेण्याची वेळ आली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to declining rainfall in Amarpur area farming activities started