esakal | इथे डोंगरावर भरतो ऑनलाइन वर्ग! ऑनलाइन शाळांचा ऑफलाइन गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

online study

इथे तर डोंगरावर भरतो ऑनलाइन वर्ग! ‘रेंज’ची बोंबाबोंब

sakal_logo
By
दत्ता इंगळे

अहमदनगर : नगर तालुक्यातील पांढरीपुलापासून ते टाकळी काझीपर्यंत सलग डोंगरी पट्टा आहे. विशेषतः देवगाव, रतडगाव, आगडगाव, रांजणी, माथणी, बाळेवाडी या भागांत कुठल्याच मोबाईल कंपनीची ‘रेंज’ मिळत नाही. त्यामुळे या डोंगरी पट्ट्यातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. कोरोना प्रादुर्भावाचा या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. (Due-to-lack-of-range-students-deprived-of-education-jpd93)

ऑनलाइन शाळांचा ऑफलाइन गोंधळ

नगर तालुक्यातील या डोंगरी भागातील काही गावांत मोबाईल मनोरे उभारले आहेत; मात्र त्यांचा उपयोग दुसऱ्याच गावांना होतो, अशी संतप्त प्रतिक्रिया या भागातील विद्यार्थी व पालक व्यक्त करीत आहेत. काही गावांत बीएसएनएलचे मनोरे आहेत; मात्र वीजपुरवठा खंडित झाला की नेटवर्क गायब होते. या डोंगरी भागात जोराचा पाऊस झाला तर आठ-आठ दिवस नेटवर्क मिळत नाही. संबंधित कंपनीने हे मनोरे अधिक कार्यक्षम केल्यास या भागातील ‘रेंज’चा प्रश्‍न सुटू शकतो. या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी करूनही आश्‍वासनांशिवाय पदरी काहीच पडले नाही.

पालकांतून अपेक्षा

राज्य शासनाने शिक्षकांना ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मोबाईलला रेंजच मिळत नसेल तर शिक्षक शिकवणार तरी कसे? त्यामुळे या प्रश्‍नात तातडीने लक्ष घालून येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होत आहे.

डोंगरी पट्ट्यात वीजनिर्मिती जोरात

उत्पन्न मिळत असल्याने खासगी कंपन्यांनी या डोंगररांगांवर वीजनिर्मितीसाठी पवनचक्क्यांचे जाळे उभे केले आहे. त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी खास यंत्रणा कार्यरत आहे; मात्र विद्यार्थांच्या भवितव्याशी निगडित मोबाईल मनोऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा: वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : छिंदमविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

डोंगरावर भरतो ऑनलाइन वर्ग

गावात मोबाईलला ‘रेंज’ मिळत नसल्याने शेजारील टेकडी, डोंगरावर ज्या ठिकाणी ती मिळेल, तेथे बसून विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

पाल्यांसह पालकांची शहराकडे धाव...

महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ असा नारा दिला होता. येथे मात्र उलटी परिस्थिती आहे. डोंगरी भागात मोबाईलला ‘रेंज’ मिळत नसल्याने अनेक पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शहरात भाडेतत्त्वावर खोल्या घेऊन राहत आहेत.

वारंवार नेटवर्क गायब होत असल्याने शिकवताना व्यत्यय येतो. शिकविलेले विद्यार्थ्यांना नीट समजत नाही. पालकांना शेतीच्या कामामुळे पाल्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. परिणामी, ऑनलाइन शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी शिक्षकांवर पडते. - श्‍यामसुंदर वाघुले, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, आगडगाव

हेही वाचा: मांडवाच्या दारात कोरोनाचे विघ्न! तपासणीत आढळले ४३ बाधित

loading image